राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघात प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्स या विमान कंपनीची चार विमाने ग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी जी कारवाई झाली त्यावर आम्ही नाराज आहोत अजिबात समाधान मानू शकत नाही. DGCA वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

डीजीसीएच्या कारवाईवर मी अजिबात समाधानी नाही. थातुरमातुर कारवाई करुन चार विमानांवर बंदी आणत असतील तर जनतेच्या मनातला जनक्षोभ आणखी वाढेल. डीजीसीएने एक महिन्यानंतर अहवाल दिला आहे. ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनी जळालेल्या अवस्थेत सापडला.VSR कंपनीचं विमान अजितदादांना देण्यात आलं ते नादुरुस्त आहे हा दावाही आम्ही आधीच केला आहे. सुमीत कपूरची हिस्ट्री ऑन ड्युटी दारु पिण्याची आहे. त्याबाबत एकही शब्द या अहवालात नाही. त्यामुळे आम्ही या कारवाईवर समाधानी नाही. डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि VSR कंपनी कायमची बंद झाली पाहिजे. शिवाय या कंपनीने प्रत्येक पायलटचा ५० कोटींचा विमा काढला आहे, सुमित कपूरला सुसाईड बॉम्बर म्हणून तिथे होता अशी शंका आम्हाला आहे. त्याबाबत कंपनीने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.

VSR ची विमानं नादुरुस्त आहेत हे त्यांना माहीत होतंं-मिटकरी

डीजीसीएला वाटलं की सगळं घडून गेलं आता काही होणार नाही. पण पत्रकार परिषदा सातत्याने होत होत्या. त्यामुळे डीजीसीएला हे कळलं की हे प्रकरण आपल्या अंगलट येणार, त्यांना याची कल्पना होती की VSR कंपनीची विमानं नादुरुस्त आहेत, त्यांनी हे मान्य केलं. राज्याचा इतका मोठा नेता आणि इतर लोक अपघातात बेचिराख झाले. त्यामुळे डीजीसीएवर सदोष मनु्ष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.

रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय?

रोहित पवार यांनी अहवालाचा फोटो शेअर करत म्हटले की, VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून बरेच काही समोर यायच बाकी आहे. या विषयावर सविस्तर बोलेल… असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.