Finance Ministry NCP Demand: राष्ट्रवादीकडे अर्थखातं देण्याबाबत वारंवार विविध वक्तव्य समोर येत असतात. आता राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखातं देण्याची विनंती केली आहे. “सुनेत्रा पवारांकडे अर्थखातं देण्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनीच बोलून दाखवली होती. तसेच, या खात्यावर राष्ट्रवादीचाच हक्क आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यांच्या निर्णयाकडे तमाम राज्याचे लक्ष लागले आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी म्हटले आहे.

अर्थ खात्यावर हक्क राष्ट्रवादीचाच – मिटकरी

अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खातं स्वत:कडे घेतले. पण, अर्थखातं राष्ट्रवादी सोपवले जावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. अमोल मिटकरींनी देखील याबाबत आता एक्सवर पोस्ट करुन देवेंद्र फडणवीसांना विनंती केली आहे. “अजित पवारांनंतर सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर बोलून दाखविली होती व तसा त्या खात्यावर हक्कही राष्ट्रवादीचाच! राज्यभरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपल्या वचनपुर्तीची अपेक्षेने वाट पाहत आहेत”, अशी पोस्ट मिटकरींनी केली आहे.

पक्षाचा स्वाभिमान जपला जावा – अमोल मिटकरी

“महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे”, असे मिटकरींनी पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करून अर्थखाते पक्षाकडे सोपवावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यामुळे महायुतीतील विश्वास अधिक दृढ होऊन कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनीही पक्षाच्या स्वाभिमानासाठी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ठामपणे पोहोचविण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहनही मिटकरींनी केले आहे.

शब्द पाळण्याची विनंती

“दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे”, असे म्हणत मिटकरींनी, “शब्दाला किंमत असते. तो पाळला गेला तर विश्वास वाढतो; आणि विश्वास टिकला तरच युती अधिक मजबूत होते. आपल्या निर्णयाकडे तमाम राज्याचे लक्ष लागून आहे”, असे पोस्टच्या अखेरीस म्हटले आहे.