scorecardresearch

“अजून बरंच काही बाकी आहे”, शिवसेनेतील बंडाळीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!

अमोल मिटकरी म्हणतात, “इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे!”

“अजून बरंच काही बाकी आहे”, शिवसेनेतील बंडाळीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!
संग्रहित छायाचित्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर ३० जून अर्थात गुरुवारी त्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन देखील बोलावलं आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासांत राज्यात नेमकं काय घडणार आहे? याविषयी मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून राज्य सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच, राज्यपालांनी दिलेले आदेश घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी याचिका देखील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं घडतंय काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीसंदर्भात निर्देश काढले. यानुसार ३० जून रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र, राज्यपालांच्या निर्देशांविरोधा महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर बंडखोर आमदार गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार बहुमत चाचणीला मुंबईत जाणार असून त्यात आमचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Maharashtra Political Crisis Live : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्या बहुमत चाचणीत…!”

“४८ तासांचा अल्टिमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…”

राज्यपालांच्या निर्देशांनंतर भाजपाकडून ४८ तासांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला जात आहे. त्यावर अमोल मिटकरींनी ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणून दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे. सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत ’48’ तासाचा अल्टfमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…अजून बरच काही बाकी आहे”, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

राज्यपाल दडपणात?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दडपणात असल्याचा दावा मिटकरींनी केला आहे. “महामहिम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का? हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे”, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या स्पष्टीकरणाचा देखील उल्लेख केला आहे. “मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला विश्वासात घेतल्या शिवाय राज्यपाल बहुमत चाचणी प्रक्रिया घेतील तर ते घटनाबाह्य ठरेल – उल्हास बापट (घटनातज्ञ).. राज्यपालांचे अनेक वर्तन घटना विरोधी”, असं मिटकरींनी ट्विटरवर नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amol mitkari ncp on bhagat singh koshyari floor test eknath shinde shivsena rebel pmw