scorecardresearch

Video: “ते बावनकुळेंचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?” ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत अमोल मिटकरींचा परखड सवाल!

अमोल मिटकरींची बावनकुळेंचा जुना व्हिडीओ शेअर करत भाजपाला खोचक सवाल केला आहे.

Video: “ते बावनकुळेंचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?” ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत अमोल मिटकरींचा परखड सवाल!
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर करायचा की नाही? यावरून सध्या राजकारण तापलं आहे. त्यासंदर्भात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात खुद्द अजित पवारांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यापाठोपाठ “औरंगजेब क्रूर नव्हता”, असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरूनही राजकारण चालू आहे. या सर्व मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावरून भाजपाला परखड सवाल केला आहे.

अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अजित पवारांनी विधानसभेत संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असं अजित पवार म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. “संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोक सापडतील ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरूनही राजकारण

दरम्यान, यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरूनही भाजपानं सुरू केली आहे. ““छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो”, असं आव्हाड म्हणाले होते. त्यावरून टीका करणाऱ्या भाजपाला आता अमोल मिटकरींनी टोला लगावला आहे.

अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटसोबत चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “क्रूरकर्मा औरंग्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी ‘औरंगजेबजी’ असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषत: टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?” असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.

“छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी भूमिका पण धर्मवीर…” अजित पवार नेमकं काय म्हणाले?

काय आहे व्हिडीओमध्ये?

अमोल मिटकरींनी बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेतील १० सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बावनकुळे आव्हाडांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ दिला आहे. “औरंगजेबजीको वो क्रूर नहीं मानते. राधे-राधे बोलने वालेपर गुनाह दाखिल करते है”, असं बोलताना बावनकुळे व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

त्यामुळे आधी अजित पवारांचं विधान आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य यावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या