Amol Mitkari On Narhari Zirwal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आलं.
थेट मंत्रालयातील एका कार्यालयातच क्लर्क अशा प्रकारे लाच घेताना आढळून आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. यावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या असून मंत्री नरहरी झिरवाळ यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बचावासाठी आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले आहेत. ‘सुपारी देणारा कोण? हे लवकरच समोर येईल. ज्यांनी हे षडयंत्र रचलं असेल त्यांचे कारनामे लवकरच उघड होतील’, असा सूचक इशारा अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
“मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. नरहरी झिरवाळ हे गोरगरीबांमध्ये रमणारे आणि आदिवासी समाजातील चेहरा आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक आदिवासी समाजाला बदणाम करण्यासाठी नरहरी झिरवळांच्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आलं आहे. पण ही सुपारी देणारा कोण? याचा तपास नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लावेल. अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही. मंत्री नरहरी झिरवाळ हे आधिपासून पारदर्शकपणे कारभार करत आलेले आहेत. पण आता ज्यांनी कोणी हे षडयंत्र रचलं असेल त्यांचे कारनामे लवकरच उघड होतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयामध्ये एसीबीने गुरुवारी छापा टाकला. यावेळी लिपिक राजेंद्र ढेरंग हे ३५ हजारांची लाच स्वीकारत असताना रंगेहात आढळून आले. एका रद्द परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. पण त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारत असताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आलं.
लाच घेताना क्लर्कला अटक होताच मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया
या सर्व घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो काही प्रकार झाला, तो अतिशय चुकीचा होता. असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून काम करतात. सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ते मुळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांना उसनवारीवर या विभागात घेतले होते. त्यांच्याकडून हा प्रकार घडला. या प्रकाराला कुठेही पाठिशी घालणार नाही.”
सदर कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास माहीत नव्हता का? या प्रश्नावर बोलताना झिरवाळ म्हणाले की, “माझ्यासमोर या कर्मचाऱ्याची तक्रार यापूर्वी कधी आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असली तरी सरकारी कर्मचाऱ्याने अशाप्रकारे पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले आहेत तर त्याची शिक्षा आता संबंधित व्यक्तीला भोगावी लागेल.”
‘…तर मी राजीनामा देईन’ – नरहरी झिरवाळ
तुमच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, असा प्रश्न विचारला असता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, तसे जर माझ्यापर्यंत धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. या भ्रष्टाचाराचे माझ्याशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असेही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

