Amol Mitkari Replied To Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती भागाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. पालकमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सुर्याला वाकोल्या दाखवल्यासारखं आहे”, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना दिलं. हेही वाचा - Raj Thackeray : “एक मांजर, दूध पिणारे उंदीर अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली महाराष्ट्राची अवस्था! “हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात विनोद” “सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. त्यांनी नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात कुठं तरी भेट दिली आहे. ज्यांना साधा एनडीआरएफचा फुलफॉर्म माहिती नाही, त्यांनी आपत्ती व्यवस्थापनावर बोलावं, हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात मोठा विनोद आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं? दरम्यान, राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पूरपरिस्थिची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांसह शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. “धरणातील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मला वाटतं की राज्य सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेले अनेक वर्ष हे मी सांगतो आहे त्याचंच हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट नसते”, असं ते म्हणाले. हेही वाचा - Raj Thackeray on Mahayuti: पुण्यातून राज ठाकरेंची सरकारच्या कारभारावर टीका, नियोजनावर ठेवलं बोट पुढे बोलताना, “आज पुणे शहर हे एक राहिलं नाही. त्याची पाच-पाच शहरं झाली आहेत. एक अधिकारी निलंबित करुन काही होत नाही. पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे, ते अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रात फक्त मतांसाठी राजकारण सुरु आहे. पण हे महाराष्ट्रासाठी चागलं लक्षण नाही. या सर्व गोष्टीचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. मग तुमच्यात काय मतभेत असतील किंवा काय मतदान करुन घ्यायचं असेल ते करा. पण अशा प्रकारे जाती-जातीमध्ये विष कलवून जर मतदान मिळवत असताल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही”, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांनाही डिवचलं, पालकमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, असे ते म्हणाले.