amol mitkari reply chandrakant patil statement on mahatma phule dr babasaheb ambedkar and karmveer bhaurao patil ssa 97 | Loksatta

“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचा मिटकरींकडून समाचार; म्हणाले, “तुम्ही मंत्रीपदासाठी…”

“नवीन शाळा सुरु करणाऱ्या संस्थाचालकांना तुम्ही…”, असेही मिटकरींनी म्हटलं.

“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचा मिटकरींकडून समाचार; म्हणाले, “तुम्ही मंत्रीपदासाठी…”
चंद्रकांत पाटील अमोल मिटकरी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत अजब विधान केलं आहे. फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली. त्यांना शाळा सुरु करण्यासाठी सरकारने अनुदान दिलं नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

“भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

हेही वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

“नवीन शाळा सुरु करणाऱ्या संस्थाचालकांना तुम्ही भीक मागा, असा अजब सल्ला दिला आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहावे. चंद्रकांत पाटीलांचं हे वक्तव्य अत्यंत भिकार** आहे,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा : “महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”

“तुमच्यासारखे भिकार** आमचे महापुरुष नव्हते. तुम्ही मंत्रीपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहिती आहे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य महापुरुषांचं अमपान करणारं आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याची योग्य वेळ आली आहे,” असा इशारा मिटकरींनी दिला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील पैठणमध्ये एका सभेला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असं विधान पाटील यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:22 IST
Next Story
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान