Ajit Pawar accident: अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते अमोल मिटकरी यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर याचा संबंध देखील अपघाताशी जोडला जात आहे. खरात प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानंतर याबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. अमोल मिटकरी यांनी तर आता अजित पवारांच्या अपघातामागे अशोक खरातच मास्टरमाईंड असल्याची शंका व्यक्त करण्यास वाव मिळत असल्याचे म्हटले आहे.

फोन कॉल्स दुर्लक्षित राहिल्याचे मत

अशोक खरातने बदललेले मोबाईल आणि केलेले फोन कॉल्स संपूर्ण प्रकरणात दुर्लक्षित राहिल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करुन अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस खरात कोणाकोणाच्या संपर्कात होता याचा देखील एसआयटी प्रमुखांनी तपास करण्याची गरज मिटकरींनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.

काय आहे मिटकरींची पोस्ट?

“अजित पवारांच्या विमान अपघातामागे कॅप्टन अशोक खरात हाच मास्टरमाईंड आहे या शंकेस वाव मिळतोय. खरातने बदललेले मोबाईल व केलेले फोन कॉल्स ही बाब या संपुर्ण प्रकारणात दुर्लक्षित राहिली आहे. २७,२८,२९,३०,३१ डिसेंबर २०२६ ला खरात वेगवेगळ्या मोबाईलवरून कुणाकुणाच्या संपर्कात राहून यथाकाळे कार्यसिद्धी करत होता हे एसआयटी तपास प्रमुखांनी तपासातून सिद्ध करायला हवे. मात्र एकंदरीत याच तपास कार्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतय”, अशी पोस्ट करुन मिटकरींनी शंका व्यक्त केली आहे.

अंजली दमानियांच्या आरोपात तथ्य – मिटकरी

अशोक खरातने पाचवेळा मोबाईल फोन बदलला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटी प्रमुखांना दिली आहे, या आरोपात तथ्य असल्याचेही मिटकरींनी यापूर्वी म्हटले होते. खरात प्रकरणाचा अजित पवार विमान अपघाताशी संबंध असल्याची शंका तेजस्विनी सातपुते यांच्याकडे व्यक्त केली होती पण, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे मिटकरींनी म्हटले होते. दमानिया यांना तरी त्या गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली होती.

रोहित पवारांचाही आरोप

आमदार रोहित पवारांनी देखील अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असल्याचे म्हटले होते. सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलल्याचा दावा रोहित पवारांनी केला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याचेही पवारांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सीबीआयकडे तपास देण्याची मागणी

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात सीआयडीकडे माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्याची गरजही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. सीबीआयकडे तपास देण्यास उशीर केल्यास संशयाचं धुकं अधिक गडद होईल, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील, अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली होती.