काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क पक्षातील कार्यकर्त्यांनी हाताने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांच्यावर भाजपा आणि अजित पवार गटातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. तसेच मिटकरी यांनी पटोले यांना सत्तेची मस्ती आली आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

अकोल्यातील वडेगाव येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली. यावेळी पटोले यांची लाडूतुला करण्यात आली. दरम्यान, काल (१७ जून) पावसामुळे पालखी सोहळ्याच्या ठिकाणी चिखल झाला होता. यावेळी पटोले चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीजवळ गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं. मात्र, मैदानावरील चिखलामुळे पटोले यांचे पाय चिखल-मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि त्यांचे पाय धुतले. पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील यावरून पटोले यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी वडेगावला गेलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते. ते पाय त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले. वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याच्या प्रथेबद्दल मी ऐकलं होतं. परंतु, लोकांकडून पाय धुवून घेण्याचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला. अशाप्रकारे जर नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना वापरून घेऊन त्यांच्याकडून आपले पाय धुऊन घेत असतील तर ही निंदाजनक गोष्ट आहे. यावरून लक्षात येतं की त्यांच्या पक्षाची नेमकी धारणा काय आहे. ही एक संतापजनक घटना आहे. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असं मला असं वाटतं.

हे ही वाचा >> “कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी जिंकेन असं सागितलं नाही, पण मटका लावणाऱ्यांनी…”, धैर्यशील मानेंचं वक्तव्य चर्चेत

मिटकरी म्हणाले, मी नाना पटोलेंना एवढंच सांगेन की त्यांनी स्वतःला संत समजू नये आणि कार्यकर्त्यांना नोकर समजू नये. तसेच कार्यकर्त्यांनी देखील एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की लोकशाहीत कोणीही मालक नसतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात कोणीही असलं कृत्य करू नये. एवढी मी विनंती करतो. त्याचबरोबर ही सत्तेची मस्ती होती का असा प्रश्न मला नाना पटोले यांना विचारायचा आहे.