डीजे आणि लाऊड स्पीकरवर बंदीविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट हे ऑगस्ट महिन्यापासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांची तार्किक युक्तिवाद करण्याची शैली, त्यांना मिळालेल्या पाठिंबा, तसंच सामाजिक भान जागं करण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुण्यात विद्यानंद बापट यांचा सत्कार करण्यात आला. मधुरजग प्रतिष्ठान आणि ब्राईट्स सोसायटी तसंच विचारवेध यांच्यातर्फे विद्यानंद बापट यांच्या या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर अमोल पालेकर यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी विद्यानंद बापट यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.
अमोल पालेकर विद्यानंद बापटांबाबत काय म्हणाले?
आपण सगळे फक्त समविचारीच नाही तर एका वेगळ्या अर्थाने आपण कनव्हर्ट्स आहोत म्हणजे आपण आधीच बदललो आहोत असं मला वाटतं. विद्यानंद बापट यांचा जो कौतुक सोहळा आहे त्याबद्दल सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. मी एक टिपण लिहून आणलं आहे असं म्हणत ते अमोल पालेकर यांनी वाचलं. ते म्हणाले, आज विद्यानंदचं कौतुक करायला आपण इथे जमलो आहोत. गणपती उत्सवात किंवा थोड्या व्यापक दृष्टीने सगळ्या धार्मिक उत्सवांमधून होणारं ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास हा त्याच्या मोहिमेचा मुख्य मुद्दा होता. विद्यानंदचं कौतुक अशासाठी की त्याने संयमाने, फारसा तोल ढळू न देता सगळ्या विरोधाला युक्तिवाद करून उत्तरं दिली. प्रसंगी संस्कृत श्लोकांचे दाखले देण्याच्या त्याच्या शैलीमुळे आणि अभ्यासपूर्ण विवेचनामुळे विरोधकांची पंचाईत झाली. स्वतःच्या भूमिकेचा पुनरूच्चार ठामपणे आणि न कंटाळता करणं ही देखील एक कौतुकाची बाब आहे असं अमोल पालेकर म्हणाले.
बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही विद्यानंदने पाठपुरावा केला-अमोल पालेकर
अमोल पालेकर यांनी यानंतर असं म्हटलं आहे की, “माझ्या लेखी महत्त्वाचं योगदान म्हणजे विद्यानंद ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरच तो थांबला नाही तर बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही पाठपुरावा त्याने केला. ही लाखमोलाची बाब आहे. भर गणेशोत्सव तोंडावर असताना मी नास्तिक आहे हे सांगण्याचं धाडस भलेभले करणार नाहीत. नास्तिकांच्या भूमिकेला समजून न घेणारी मंडळी, नास्तिक म्हणजे अश्रद्ध असं सोपं समीकरण करतात. विद्यानंद त्यालाही थेट छेद देतो. त्याची समाजहिताबाबतची निष्ठा ही त्याची निष्ठा ठरते. दॅट्स हिज फेथ. तो नास्तिक असूनही बहुतांश सर्वसामान्य पुणेकर त्याच्यामागे उभे राहिले हे पण विशेषच म्हणावं लागेल. मुंबई उच्च न्यायालयाने सुओमोटो म्हणजे स्वतःहून ध्वनी प्रदूषणावर सरकार काय उपाययोजना करतंय यात लक्ष घातलं आहे.
विद्यानंद बापटचा संघर्ष नागरिकांच्या संघर्षाचं प्रतिनिधीत्व करतो-अमोल पालेकर
विद्यानंद बापटचा संघर्ष हा नागरिकांनी व्यवस्थेविरोधात उभ्या केलेल्या संघर्षाचं प्रतिनिधीत्व करतो. मँचेस्टर, स्पेनध्ये स्थानिक रहिवाशांनी डिस्को आणि पब्समधून होणाऱा ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा किंवा हिथ्रोमधला संघर्ष अशी काही संघर्षाची उदाहरणंही आपल्याला ठाऊक आहेत. जगात अशी अनेक उदाहरण आहे. काही लढ्यांमुळे नियम बदलले गेले. काहींनी संघर्षाची ठिणगी पाडून एका वणव्याची सुरूवात केली. संघर्ष करायची तयारी आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. संधीसाधू पणे किंवा बोटचेपेपणा करत पदरात येईल ते स्वीकारणं हा स्वभाव बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाने छोट्या पातळीवर विरोध करत राहिलं पाहिजे.ध्वनी प्रदूषणाइतकेच इतर नागरी मुद्दे म्हणजे कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरचे खड्डे, पाण्याचं नियोजन हे आपले रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय झालं पाहिजे.”
