एसटी बसखाली सापडून १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त जमावाची जाळपोळ

परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

वरुड येथील विश्रामगृहाजवळ एसटी बसने ताविज पठाणला धडक दिली आणि बस खाली सापडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे भरधाव एसटी बसखाली सापडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यानंतर संतप्त जमावाने या मार्गावरील दोन एसटी बसला पेटवून दिले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

वरुड येथील शांतिनिकेतन शाळेत सातवी इयत्तेत शिकणारा ताविज राजा फिरोज खान पठाण हा विद्यार्थी सायकलवरुन शाळेत जाण्यासाठी निघाला.  वरुड येथील विश्रामगृहाजवळ एसटी बसने ताविज पठाणला धडक दिली आणि बस खाली सापडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसची तोडफोड करत तिला पेटवून दिले. याच मार्गावरुन येणाऱ्या आणखी एका एसटी बसलाही जमावाने रोखले. प्रवाशांना खाली उतरवून या बसलाही आग लावण्यात आली. आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर जमावाने दगडफेक केली. जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रोषाचा सामना करावा लागला. शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमावाला पांगवले. सध्या वरुड येथे शांतता असून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amravati 13 year old school boy hit by st bus died in warud mob torches 2 bus