मोहन अटाळकर  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गेल्या २१ जूनला हत्या करण्यात आली. वादग्रस्त नूपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीनंतर धार्मिक सौहार्द कायम राहावे, यासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न करण्यात आले; पण धार्मिक कट्टरवादातून घडलेल्या हत्येच्या या घटनेने सांधत आलेली धार्मिक दरी रुंदावण्यास हातभार लागेल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

५४ वर्षीय उमेश कोल्हे हे पशुवैद्यकीय व्यावसायिक होते. त्यांच्यावर पाळत ठेवून योजनाबद्ध हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.  या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य सूत्रधार इरफान खान आणि पशुवैद्यक युसूफ खान यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. उमेश कोल्हे आणि युसूफ खान हे व्यावसायिक मित्र होते. त्यांच्यात काही आर्थिक व्यवहारही झाल्याचे सांगितले जाते. ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहाचे ते दोघेही सदस्य होते. हत्येच्या घटनेच्या आधी उमेश कोल्हे यांनी या समूहावर वादग्रस्त नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी प्रतिक्रिया पाठवली. त्यामुळे युसूफ खान दुखावला गेला. त्याने या प्रतिक्रियेचे ‘स्क्रीन शॉट’ काढून ते आपल्या विविध समूहांमध्ये पाठवले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

मुख्य सूत्रधार इरफान खान आणि भडकविणारा युसूफ खान यांच्यातील परस्परसंबंध आता पडताळून पाहिले जात आहेत. इरफान खान हा ‘रहबर’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवतो. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याने स्वत:ची ओळख तयार केली. करोनाकाळात त्याने अनेक लोकांना मदतही केल्याचे सांगितले जाते; पण पोलिसांनी त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. इरफान खान हा कमेला ग्राऊंड भागातील एका चाळीत राहतो. इतर पाच आरोपींसोबत त्याने हत्येची योजना तयार केली आणि त्यांना कामे सोपवली होती. त्यांना वाहने आणि रोख रक्कमही पुरवली. हे आरोपी इरफान खान याच्यासोबत अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी झाले होते, अशीही माहिती समोर आली आहे. आता या संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. हत्येचा कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा तपास ‘एनआयए’कडून सुरू झाला आहे.

या दरम्यान, नूपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर पुढे पाठवणाऱ्या शहरातील काही नामांकित लोकांना धमक्या देण्यात आल्या. या लोकांनी नंतर समूहांवर माफीही मागितली. माफीच्या चित्रफितीदेखील तयार केल्या. दहशतीपोटी पोलिसांकडे अजून तक्रारी करण्यात आल्या नसल्या, तरी उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या लोकांना दिलासा देण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

धार्मिक तणावाचा पूर्वेतिहास

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्रिपुरा येथे एका प्रार्थनास्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरली आणि राज्यातील काही भागांत अल्पसंख्याक संघटनांनी मोर्चे काढले. अमरावतीतही अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात आला. रझा अकादमी आणि इतर अल्पसंख्याक संघटनांनी काढलेल्या या मोर्चाबाबत पोलिसांचा अंदाज पूर्णपणे चुकला. २० ते २५ हजार लोक या मोर्चात सहभागी झाले होते; पण तो नेतृत्वहीन होता. काही समाजकंटकांनी मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक केली. दुकानदारांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर भाजपने त्याचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी अमरावती बंद पुकारला. त्या वेळी झालेल्या हिंसाचारात प्राणहानी झाली नसली, तरी त्यानंतर धार्मिक दरी वाढल्याचे दिसून आले. धार्मिक ध्रुवीकरणातून राजकीय ईप्सित साध्य करण्याची स्पर्धा आता राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे.  चिथावणीखोर वक्तव्ये, समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांवर होणारी चिखलफेक यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्या संघटना सक्रिय आहेत, याचा शोध आता तपास यंत्रणांना घ्यावा लागणार आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati center religious fundamentalism umesh kolhe killed supporting nupur sharma amy
First published on: 05-07-2022 at 06:05 IST