scorecardresearch

“नाना पटोलेंनी फोनवर सांगितलं वरून दबाव आहे, फार मोठ्या खोक्यांची…”, नवनिर्वाचित आमदार लिंगाडे यांचा गौप्यस्फोट

अमरावती विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

dheeraj lingade
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागायला अनेक तासांचा कालावधी लागला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. अटीतटीच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर धीरज लिंगाडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती. नाना पटोलेंनी याची माहिती आम्हाला दिली आणि मतमोजणी टेबल सोडून कुठेही जाऊ नका, असा आदेश दिला. त्यामुळे संपूर्ण मतमोजणी होईपर्यंत आम्ही तिथेच होतो, अशी माहिती लिंगाडे यांनी दिली.

हेही वाचा- “तो एबी फॉर्म योग्यच”; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, पुरावेही केले सादर

खरं तर, आज बुलढाणा शहरात आगमन झाल्यावर लिंगाडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या सत्कार सोहळ्याच्या समारोपात मनोगत व्यक्त करताना आमदार लिंगाडे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते. त्याचबरोबर व्यासपीठावर जिल्ह्यातील आघाडीचे नेते, पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते. यावेळी लिंगाडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

हेही वाचा- “…भाजपात आलोय, ही माझी अडचण”; फडणवीसांच्या उपस्थितीत भरसभेत नारायण राणेंचं विधान!

यावेळी भाषणात लिंगाडे म्हणाले की, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दीर्घकाळ चाललेल्या मतमोजणीदरम्यान भाजपाने अवैध ठरलेल्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दवाब आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीचे टेबल सोडून जाऊ नका, असा आदेश त्यांनी दिला. नाना पटोलेंच्या आदेशाचं पालन करून मी ही फेरमोजणी केवळ दहाच टेबलवर करावी, अशी मागणी केली. तसेच प्रत्येक टेबलजवळ आम्ही तीन कर्मचारी उभे केले. त्यानंतर सर्व काही सुरळीत झालं, अशी प्रतिक्रिया धीरज लिंगाडे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 22:47 IST
ताज्या बातम्या