Amravati Paratwada Case Pyare Khan PC: भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार व अमरावतीमधील प्रभावी नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणी केलेल्या दाव्यांवरून मोठी चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणातील पीडित मुली हिंदू असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. मात्र, आज अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. परतवाड्यात आरोपी अयान अहमदच्या विकृतीला बळी पडलेल्या सर्व मुली मुस्लीम समाजाच्या असल्याचं प्यारे खान यांनी सांगितलं आहे. तसेच, या प्रकरणी चुकीचे दावे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न नवनीत राणा करत असल्याचंही ते म्हणाले.
एकूण ८ मुली, सर्व अल्पसंख्याक – प्यारे खान
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीचा उल्लेख केला. “एसपी विशाल आनंद यांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणात ८ पीडित मुली आहेत. त्या सर्व मुली अल्पसंख्याक आहेत. यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही. अशा अफवा पसरवल्या जात होत्या की यात १८० मुलींचं शोषण झालं आहे आणि त्या सर्व हिंदू समाजाच्या आहेत वगैरे. पण असं काहीही नाही. त्या सर्व मुली मुस्लीम समाजाच्या आहेत. यासंदर्भातल्या सर्व अफवा निराधार होत्या. तिथे वातावरण बिघडावं यासाठी या अफवा पसरवल्या जात होत्या”, असं प्यारे खान म्हणाले.
अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई – प्यारे खान
दरम्यान, परतवाडा प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचंही प्यारे खान म्हणाले. “अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा कितीही प्रभावी असो. नयन सुगंधे नावाचा आरोपी अयान अहमदला खोली उपलब्ध करून द्यायचा. तिथे हे सगळे प्रकार केले जात होते. यापैकी दोन मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इतर ६ मुलींचे फक्त फोटो व्हायरल झाले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
नवनीत राणांच्या परतवाडा प्रकरणातील दाव्यांवर टीका
यावेळी प्यारे खान यांनी बोलताना नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्यांचा समाचार घेतला. “नवनीत राणांना महाराष्ट्र-देश उद्ध्वस्त करायचाय, हिंदू मुलींना उद्ध्वस्त करायचंय. त्यांनी हा विचार करायला हवा की त्या अमरावतीत आहेत. जर मला नागपूरमध्ये बसून कळू शकतं की त्यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही, तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की सर्व मुली हिंदू होत्या. हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही स्वत: एक महिला आहात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांना सक्षम करू इच्छित आहेत. संसदेत महिलांसाठी विधेयक येत आहे. पण तुम्ही महिलांना उद्ध्वस्त करत आहात”, अशा शब्दांत प्यारे खान यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली.
“आमच्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. जर कुठल्याही पीडित व्यक्तीची माहिती कुणी जाहीर करत असेल, तर त्याच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई केली जाईल. त्यामुळे असत्य पसरवणं बंद करायला हवं. नवनीत राणांना दंगली घडवण्याची इतकीच इच्छा असेल, तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना यात पुढे आणावं. तुम्हाला मुसलमानांबाबत विचार करण्याची गरज नाही. जर देशात हिंदू सक्षम होतील, तर मुसलमानही तसेच सक्षम होणार आहेत”, असंही प्यारे खान पत्रकार परिषदेत म्हणाले.
नवनीत राणांनीच पाकिस्तानात जावं – प्यारे खान
“तुम्हाला देश तोडायचाय. तुम्ही वारंवार म्हणता की पाकिस्तानला निघून जा. पण या देशातला मुसलमान खूप सुखी आहे. मला वाटतंय तुम्हाला पाकिस्तानची खूप आठवण येतेय. मग तुम्हीच पाकिस्तानला निघून जा”, असं प्यारे खान म्हणाले.
व्यक्तिगत वादामुळे टोकाचं पाऊल
दरम्यान, परतवाडा प्रकरणात धर्माचा कोणताही मुद्दा नसल्याचं प्यारे खान यांनी स्पष्ट केलं. “यात धर्माचा कोणताही मुद्दा नाहीये. दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्या मुलींशीही संपर्क साधून काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून त्या मुलानं ते सगळे व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल केले. त्या मुलींपैकी चार परतवाडा, ३ अमरावती व एक नागपूरची मुलगी आहे”, असं ते म्हणाले.
