अमरावती : राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

‘३६ दिवस पाखडले, काहीच नाही सापडले’ अशा शब्दात राणा दाम्पत्याच्या मुंबई, दिल्ली वारीची खिल्ली शिवसेनेने उडवली आहे.

अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अमरावती आगमनाच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली असतानाच शिवसेनेने ठिकठिकाणी पोस्टर लावून राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे शहरात राणा दाम्पत्य आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राणा दाम्पत्याचे शनिवारी सायंकाळी अमरावतीत आगमन होत आहे.

‘३६ दिवस पाखडले, काहीच नाही सापडले’ अशा शब्दात राणा दाम्पत्याच्या मुंबई, दिल्ली वारीची खिल्ली शिवसेनेने उडवली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख पराग गुडधे यांनी पोस्टरद्वारे राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.

मोदी सरकारच्या काळात अचलपूरच्या फिनलेमिल मिलचा भोंगा ही बंद पडला, कामगार बेरोजगार झाले आहे त्याची चिंता हनुमान चालिसा पठनातून व्हायला हवी, बडनेरा -अमरावती शटल रेल्वे कधी सुरू होणार, ब्रिटिश कालीन शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज होणार का ? अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या त्या केव्हा सुरू होणार, चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्णतः बंद आहे, बी डी एल कारखाना आयुध निर्माण ऐवजी गवताचे कुरण झाले आहे, आपल्या कार्यकाळात एकही मोठी योजना अमरावती जिल्ह्यात न राबविता सतत वादग्रस्त राहून अमरावतीकरांना वेठीस धरण्यात येत आहे. केवळ पुतळे उभे करायचे म्हणून राजकारण करणाऱ्या खासदार- आमदारांना अमरावतीकर आता कंटाळले आहेत. खासदारांनी शेतात पेरणी करतानाचे फोटो टाकून यावर्षी शेतकऱ्यांच्या खत टंचाई वर मीठ चोळू नये, केंद्रातून मदत मिळवावी, केवळ ठिकठिकाणी हनुमान चालीसा वाचून शेतकरी सुखी होणार नाही, असे शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati shivsena put up posters against rana couple asj

Next Story
“घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही”; छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांची प्रतिक्रिया
फोटो गॅलरी