Yashomati Thakur and Harshjeet Deshmukh verbal war: अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसत असून, काँग्रेस उमेदवार हर्षजीत देखमुख आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हर्षजीत देशमुख भाजपाला मॅनेज झाल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर देशमुखांनी मी नव्हे तर ठाकूरच मॅनेज झाल्याचा पलटवार रुग्णालयातून केला. दरम्यान, आता यशोमत ठाकूर यांनी हर्षजीत यांना रुग्णालयातून बाहेर येऊन निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे.
ठाकूर यांचे देशमुखांना आव्हान
हर्षजीत देशमुख भाजपाला कसा होईल अशा भूमिका घेत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला. “उलटा चोर कोतवाल को डाँटे, काल आजारी होते, आयसीयुत होते, ४-५ दिवस बाहेर येण्यासाठी लागतील असे सांगत आहेत. डॉक्टरांचे यावर काही माहिती समोर आलेली नाही. संवाद हवा की नको? आणि तुम्ही तयार असाल तरी बाहेर या आणि मैदानावर उतरा, निवडणुकीसाठी ४-५ दिवस उरले आहेत. कशासाठी नाटकं करताहेत. ही सगळी विधानं भाजपाला कसा फायदा होईल, अशा पद्धतीने केली जात आहेत”, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केले प्रश्न
“हर्षजीत यांच्यात दम असेल तर त्यांनी बाहेर यावं आणि निवडणूक लढवावी”, असे आव्हान देखील यशोमती ठाकूर यांनी दिले. “निघा बाहेर, रुग्णालयातून बाहेर या. डिजिटलमार्फत प्रचार असतो का? काय बालिशपणा सुरु आहे. आम्ही त्यांना सर्वांची भेट घालून दिली. पण, अचानक व्यक्ती गायब होतो? त्यांनी बाहेर यावं आणि निवडणुकीला सामोरे जावं, आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत”, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. “आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत, पण, निवडणुकीतील उमेदवार तर इथं उपस्थित हवा?,” असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
१५-२० कोटींचा आरोप आणि देशमुखांचे स्पष्टीकरण
हर्षजीत आयसीयुमध्ये दाखल असल्याचे सांगितले जाते पण, ते माध्यमांना आयसीयुमध्ये मुलाखत देतात? असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित करत त्यांना मॅनेज करण्यासाठी १५-२० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला. दरम्यान, हर्षजीत देशमुख यांनी यशोमती ठाकूर यांच्या आरोपांचे खंडन करत, प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागल्याचे स्पष्टीकरण दिले. “ठाकूर यांचा आयसीयुमधून मुलाखत दिल्याचा आरोप निराधार आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशमुखांनी ठाकूर उमेदवारी मागे घेण्यासाठी एकप्रकारे दबाव आणत असल्याचाही आरोप केला. तसेच, यामुळे नक्की कोण मॅनेज झाले? असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
