हिंसक आंदोलनांमुळे अस्वस्थ झालेल्या अमरावती शहरामधील सर्व व्यवहार सुरळीत झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावतीमध्ये मागील आठवड्यात आसाममधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाने केलेल्या मोर्चांदरम्यान हिंसा झालेली. यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. मात्र आता शहरातील व्यवहार सुरळीत झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिलीय.

अमरावती शहरातील परिस्थिती सर्वसामान्य झाली असून सकाळच्या वेळेतील दैनंदिन व्यवहार सुरुळीत सुरु आहेत. शहरामधील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजतापासून तर रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, अशी माहिती सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

अमरावती हिंसाचारदरम्यान झालेलं नुकसान, लूटमारीविरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केल्याचं आयुक्तांनी सांगितलं. या ५७ गुन्ह्यांमध्ये ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात असल्याची माहिती सिंह यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना दिली.

अमरावती शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तर सर्वत्र आता शांतता असून सर्व परिस्थिती तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत, असंही पोलिस आयुक्त सिंह यांनी सांगितले