मुंबई : रस्ते किंवा पुलांच्या कामांकरिता वन जमिनींचे संपादन करताना पाळावे लागणारे कायदे, नियम-अधिनियम, सूचना आदींचा गृहपाठ करण्यात अभियंते कच्चे पडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते विकासाची कामे रखडत आहेत. यावर तोडगा म्हणून वन क्षेत्रातील कामांचा अनुभव असलेल्या विभागातील अभियंत्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. त्यात अमृतकाळ रस्ते विकास योजनेची भर पडून २०२५-४७ या काळात रस्त्यांचे जाळे अधिकाधिक मजबूत केले जाणार आहे. या योजनेद्वारे राज्यातील औद्योगिक दळणवळण, पर्यटन, वारसा स्थळे इत्यादी जोडण्याकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण केले जाईल.
जे रस्ते वन विभागातून जातात, त्यांचा विकास करताना विविध नियम-अधिनियमांचे पालन करावे लागते. काम वेळेत पूर्ण होऊन, प्रकल्पाचा खर्च वाढू नये म्हणून अभियंत्यांनी वन जमिनींचे संपादन करण्याकरिता लागणाऱ्या कायदेशीर परवानग्यांचे नियोजन बांधकाम सुरू होण्यापूर्वीच करणे महत्त्वाचे असते. परंतु, किचकट कायदे, वेळेचे बंधन आणि योग्य समन्वयाचा अभाव यामुळे मोठे प्रकल्प रखडतात.
क्षेत्रीय अभियंत्याना वन (संवर्धन) अधिनियमां’च्या अभ्यासाअभावी या समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वनक्षेत्रातील कामांचा पुरेसा अनुभव असलेले नागपुरचे संभाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधती शर्मा, निता ठाकरे, सोनाली चव्हाण, रावबहाद्दूर पाटील, निशा धाबेकर या गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, नागपूर येथील अभियंत्यांचा समितीत समावेश असेल.
समितीवरील जबाबदारी
रस्ते आणि पुलाच्या कामासाठी वनजमिनीचे संपादन करावयाचे असल्यास कमीत कमी वेळेत नियोजनबद्धपणे वन विभागाची परवानगी घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी या समितीवर असेल.
