Amruta Fadnavis on Ashok Kharat case : राज्यात अशोक खरात प्रकरणी प्रचंड चर्चा सुरू आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याच्याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणावरून सर्वस्तरावरून प्रतिक्रिया येत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावर त्यांचं मत प्रदर्शित केलं आहे. त्या झी २४ तासच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
अशोक खरातप्रकरणी प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “अशोक खरात प्रकरण भयानक प्रकरण आहे. या प्रकरणातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. डोळे बंद करून बाबांवर विश्वास ठेवणं उचित नाही. अंधविश्वास करतो तेव्हा घात होतो. आपल्याला डोळे उघडे ठेवून जगणं आवश्यक आहे. आपण आपल्या ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. सर्वकाही आपल्या आत आहे. आत आपण एकदम पूर्ण आहोत. आपले आत्पेष्ट किंवा आपल्या गुरुंपासून दूर जाऊन आपल्याला कोणाची गरज आहे असं मला वाटत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याकडून अशा बाबा बुवाबाजीला प्रोत्साहन देऊ नका. असं पुढे आल्यावर त्यांना बहिष्कार करणं गरजेचं आहे. सरकार याविरोधात आपल्याला मदत करेलच. “
श्रद्धा अन् अंधश्रद्धेतील फरक कसा ओळखावा?
“श्रद्धा आपल्या विचारांवर असते. आपल्या वेदांवर आपली श्रद्धा असते. चांगलेपणावर श्रद्धा असते. तुम्ही घरी बसल्यावर फळ पाहिजे म्हणून तुम्ही कोणाकडे गेलात आणि त्याकरता शॉर्टकटमध्ये जे करता ती अंधश्रद्धा आहे. श्रद्धा स्वतःच्या आतून निघते”, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक कसा ओळखावा हे स्पष्ट केलं.
जीवनात स्पष्टता येते
“तुम्ही वेद, गीता, रामायण, महाभारत वाचलंय. जिथे खऱ्या जीवनातील शिकवणी आहेत. आपण कसं वागलो तर काय होऊ शकतं, याचे पाठ यात आहेत. आपल्याकडेच सर्व गोष्टी आहेत. हे सर्व वाचल्याने त्यातून आपल्या जीवनात स्पष्टता येऊ शकते”, असंही त्या म्हणाल्या.
…तर आपल्याला कोणत्याही बाबांची गरज नाही
“श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एकच फरक आहे. आपण आपल्या भविष्याबाबत अनिश्चित असतो तेव्हा आपण इथे तिथे पाहतो. पण जेव्हा आपण मनात ठाम विश्वास ठेवतो, सातत्याने मेहन करतो, आपल्या आदर्शांच्या मार्गावर चालत राहिलो तर अशा कोणत्याही बाबांची गरज भासत नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गर्व वाटायची गरज नाही
अशोक खरात प्रकरणाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करत मूळापर्यंत प्रकरण नेलं. याविषयी अमृता फडणवीसांना विचारलं असता त्या म्हणाल्या, “याविषयी गर्व वाटायची गरज नाहीय. कारण एवढं झाल्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचलं. हे प्रकरण त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला पाहिजे होतं. जेणेकरून बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. खूप स्त्रियांचं जीवन वाचलं असतं. देवेंद्र फडणवीसांपर्यंत प्रकरण आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली, पण हे खूप आधीच व्हायला पाहिजे होतं”, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
