राज्यात मागील काही काळात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आणि थेट सत्तातरण होऊन महाविकासआघाडीच्या जागेवर शिंदे-फडणवीस सरकार आलं. नेमकं पडद्याआड काय घडामोडी झाल्या याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातील काही भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात सांगत रात्रीच्या गुप्त भेटींचा उल्लेख केला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीसांच्या वेशांतराबाबत वक्तव्य केलंय. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस सामान्यपणे खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आलं नाही, पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. ते असे दिसायचे की मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना असं एवढ्यात नवीन काय सुरू आहे असं विचारलं. ते उत्तर देणं टाळायचे. मला तरी काही ना काही चालू आहे असं वाटायचं.”

हेही वाचा : “देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या”, अमृता फडणवीसांची पुण्यात मागणी

“एकनाथ शिंदे यांचं भाषण सर्वांनी ऐकलं. त्यातून त्या पक्षाच्या सर्वच लोकांमध्ये किती अस्वस्थता होती ते लक्षात येतं. विशेषतः आमदार व कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता होती. ती कुठे ना कुठे निघणार होती. त्याला जागा देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्या आमदारांच्या अडचणीत त्यांच्या मागे उभं रहायचा निर्णय भाजपाने घेतला आणि तो चांगलाच आहे,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

ठाकरे परिवाराला काय सांगाल? अमृता फडणवीस म्हणाल्या…

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “मी त्यांना आता काहीच सांगू इच्छित नाही. मला जे सांगायचं होतं ते मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितलं आहे. आता प्रत्येक व्यक्तीविषयी इतकी जनजागृती झाली आहे आहे सांगायला काही उरलं नाही. फक्त एवढंच सांगेल की ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही’.”

हेही वाचा : “योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, फडणवीस…”, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

“मला जितकी होईल तेवढी लोकसेवा, समाजसेवा करायची आहे”

“येत्या काळात माझी आधीही जी भूमिका होती तीच असेल. मला घर सांभाळायचं आहे. मला माझं काम सांभाळायचं आहे आणि मला जितकी होईल तेवढी लोकसेवा, समाजसेवा करायची आहे. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकेन तिथं मी पुढाकार घेऊन करून दाखवेन,” असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis big claim about devendra fadnavis disguise pbs
First published on: 06-07-2022 at 10:53 IST