महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. ऑपरेशन टायगर पार पडलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली अशी चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षातील ९ पैकी ६ खासदार हे फुटले असून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे आणि ओम बिर्ला यांना त्यासंदर्भातलं पत्र दिलं आहे अशी माहिती समोर येते आहे. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांना शिवीगाळही केली. मागचे तीन ते चार दिवस शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा ‘सामना’ राजकीय पटलावर पाहण्यास मिळतो आहे. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ओळीत उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी योग दिवसाच्या दिल्या शुभेच्छा

योग दिवसाच्या निमित्ताने आम्ही योग दिवस शेतकऱ्यांच्या मुलांसह आणि मुंबई महापालिकेतील शाळेतल्या मुलांसह सेलिब्रेट करतो आहोत. शेतकऱ्यांची जी मुलं मुंबईत आली आहेत त्यांना आम्ही मुंबईची सैरही घडवणार आहोत. आज रात्री जेवण झाल्यानंतर ते सगळे आपल्या आपल्या घरी जातील. रोज योग करा आणि निरोगी राहा असंच मी सांगेन असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन टायगरबाबत अमृता फडणवीस यांचं भाष्य काय?

ऑपरेशन टायगर बाबत काय वाटतं असं विचारलं असता, अमृता फडणवीस म्हणाल्या की आज योग दिवस आहे. ऑपरेशन टायगर हा त्या दोन पक्षांमधला विषय आहे, आपण चांगल्या दिवशी फक्त योग या विषयावर बोललं पाहिजे असं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य करणं टाळलं आहे. योग दिवसाच्या कार्यक्रमात शाहिद कपूर, अनुप्रिया पटेल होते. मंगल प्रभात लोढा होते. अनेक दिग्गज लोक योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुलांसह त्यांनी योग केला याचा मला विशेष आनंद आहे असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं. तसंच ऑपरेशन टायगरचा विषय हा त्यांनी एका वाक्यात संपवला आहे.

ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे?

मागील तीन ते चार दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा दिल्लीपासून राज्यापर्यंत रंगली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. ९ पैकी ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळे होत आहोत, आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्या असं पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे ऑपरेशन राबवण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र सहापैकी एकाही खासदाराने असं काही घडलंय हे मान्य केलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनीही याबाबत काहीही माहिती माध्यमांना दिलेली नाही. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी माध्यमांसमोर पक्ष सोडणाऱ्या खासदारांना शिवीगाळ केली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षात उद्धव ठाकरेंच्या पक्षातले खासदार गेले आहेत की नाही? हा सस्पेन्स अधिकृत माहिती न आल्याने कायम आहे. अमृता फडणवीस यांनी एका ओळीत हा विषय संपवला आहे. आता पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.