Amruta Fadnavis Remark on VHP Muslim Ban Navratri Row: नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवरून हिंदुत्ववादी गोटात मतभेद समोर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरबा उत्सवात सर्वांना सामावून घेण्याची सर्वसमावेशक भूमिका मांडल्याने सत्ताधारी भाजपाची कोंडी झाली आहे. पक्षाचे नेते आता या वादावर सावध पवित्रा घेत सारवासारव करताना दिसत आहेत. द इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे सविस्तर वृत्त दिले आहे.

११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाला. गरबा आणि दांडिया आयोजकांनी मुस्लिमांना कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, सहभागी होणाऱ्यांची ओळखपत्रांद्वारे पडताळणी करावी आणि हिंदू ओळख निश्चित करण्यासाठी प्रत्येकाच्या कपाळावर टिळा लावावा, असे आवाहन विहिंपने आयोजकांना केले. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी विहिंपच्या भूमिकेचे समर्थन करत पाठिंबा दिला होता. काही समाजकंटक हिंदू नावे सांगून गरब्यात प्रवेश करतात आणि ‘लव्ह जिहाद’अंतर्गत हिंदू महिलांना लक्ष्य करतात, असा आरोप केला होता.

याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “आपला सण सर्वसमावेशक आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती येऊन शांततेत गरब्याचा आनंद घेत निघून जात असेल, तर त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही,” असे त्या म्हणाल्या. गरबा हा आता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा सांस्कृतिक उत्सव बनला असून, कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या व्यक्तीने शांततेत आणि गोंधळ न घालता सहभागी होण्यास हरकत नसावी. मात्र यामागे इतर काही कारणे असतील तर त्याचा मी अभ्यास केलेला नाही, असेही त्या म्हणाल्या. माध्यमांनी नितेश राणेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यावर बोलणे त्यांनी टाळले.

विहिंपची प्रतिक्रिया काय?

दरम्यान विहिंपने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सहसचिव श्रीराज नायर म्हणाले, “नवरात्रोत्सवात मुस्लिमांवर पूर्ण बंदी असावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. संघटना म्हणून आमचे स्वतंत्र धोरण आहे. नवरात्र हा देवी दुर्गा आणि अंबामातेच्या उपासनेचा हिंदू धार्मिक उत्सव आहे. जेव्हा मुस्लिमांचा मूर्तीपूजेवर विश्वासच नाही, तर मग त्यांनी या उत्सवात कशासाठी सहभागी व्हावे?”

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी मात्र काहीशी मवाळ भूमिका घेत, “मुस्लिमांनी गरब्यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी शुद्ध हेतूने यावे,” असे म्हटले. मात्र लव्ह जिहादचा त्यांनी कडाडून विरोध केला.

भाजपाची भूमिका सौम्य?

दुसरीकडे भाजपा नेत्यांनी या वादापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका कॅबिनेट मंत्र्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, “विहिंप ही आमची संलग्न संघटना असली तरी ती भाजपपेक्षा वेगळी आहे. मुस्लिमांवर बंदी घालण्याचे कोणतेही आवाहन भाजपाने केलेले नाही. हे उत्सव प्रामुख्याने खासगी पातळीवर आयोजित केले जातात आणि त्यात सरकारची भूमिका मर्यादित असते.”

भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही प्रवेशबंदीची मागणी फेटाळून लावली. “आम्ही कोणावरही बंदी घालण्याची मागणी करत नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा हिंदूंचे नुकसान होऊ नये. सुरक्षेचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे बान यांनी नमूद केले.

भाजपाच्या एका रणनीतीकाराने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, “सरसंघचालक मोहन भागवत यांनीही न्यूयॉर्कच्या दौऱ्यात एकात्मतेचा आणि सर्वसमावेशकतेचा वैश्विक संदेश दिला आहे. तरुण मतदारांमध्ये पक्षाची प्रतिमा संकुचित किंवा कर्मठ होऊ नये, याची भाजपाला पूर्ण जाणीव आहे. दांडिया आता जात-धर्माच्या पलीकडे जाऊन साजरा केला जाणारा लोकोत्सव बनला आहे.”

‘नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, काँग्रेस

या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करत थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली. “वहिनींनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह असून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा त्यांचा विचार योग्य आहे. मात्र त्यांचे विचार खरे असतील तर वारंवार मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी त्या मुख्यमंत्र्यांकडे करतील का?”, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.