महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन मागच्या आठवड्यात पार पडलं. या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांची खुमासदार भाषणं झाली. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी आशिष शेलार यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीस यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं. असं विधान केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिश्किलपणे ही कोपरखळी मारली होती, त्याबाबत प्रश्न विचारला असता आता मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“आशिष शेलार आत्ता म्हणाले की राज ठाकरेंनी बोलवलं की मुख्यमंत्री येतातच. मी यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येतील २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. असं राज ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले आणि एकच हशा पिकला. आता मी काय सांगू?” असंही राज ठाकरे म्हणाले. ग्रंथालीतर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास भाषण केलं. याच विधानाबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्या खास शैलीत यावर उत्तर दिलं.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे म्हणाले ते त्यांनी मिश्किलपणे म्हटलं होतं. कशाची हेडलाईन होईल हे राज ठाकरेंना माहीत आहे त्यामुळे ते बोलत असताना हेडलाइन होईल असंच बोलतात.” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू अलिकडे एका कार्यक्रमात भेटले असता त्यांची बंद दाराआड चर्चा झाली अशी चर्चा झाली, असं म्हटलं गेलं. या विषयावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, राजकारणात कोणीही शत्रू नसते, कोणी एकमेकांचे शत्रू मानले नाही पाहिजे.

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

पुण्यात दिवाळीनिमित्त एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी चर्चा करत असताना त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवही भाष्य केलं, मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधी सरकार काम करत असून दुष्काळामध्ये सरकार त्यांच्या पाठीशी आहे. पाच हजार रूपये अग्रीम मदत म्हणून दिले जात आहेत. तसंच शेतकऱ्यांना इतर मदत दिली जाते आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम ही कधीही योग्य नसते, पण तरीही सरकार प्रयत्न करतं आहे. सर्व शेतकऱ्यांना ही मदत पोहोचणार आहे, असं मत त्यांनी दिवाळी पूर्वी दिल्या जाणाऱ्या अग्रीम मदतीबद्दल बोलताना मांडलं आहे.