Amruta Fadnavis on Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा १३ वा दिवस आहे. उपोषणादरम्यान ते सातत्याने सरकारवर टीका करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, असं त्या म्हणाल्या.
कोणाच्याही ताटातलं काढून आरक्षण देणार नाही, अशी थेट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता लक्ष्य केलं जातंय. तसंच, मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवायची आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. मनोज जरांगेंनी आता उपोषण सोडावं, अशी मागणी केली जातेय. मात्र, ते उपोषणावर ठाम असून आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
दरम्यान, नागपूरमधील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना या उपोषणाविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या, “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत. मी त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण देते.”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मराठा समाजाला आरक्षण देताना संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असलेले सर्व पर्याय तपासले जातील. कोणाच्या ताटातले काढून कोणाच्या ताटात टाकणारे आम्ही नाही. सर्व समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असून संविधानात ज्या बाबींची तरतूद आहे त्या निश्चितपणे दिल्या जातील. मराठा समाजासाठी आतापर्यंत जे निर्णय घेतले, सवलती दिल्या त्या आम्हीच दिल्या असून मराठा समाजाला न्याय हेच सरकार देणार, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
