Amruta Fadnavis on Nanakram Nebhnani Statement: बदलापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले असताना दुसरीकडे महिलांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या एका नेत्यानं थेट महिलांना स्वसंसरक्षणासाठी रिवॉल्व्हर देण्याची मागणी केल्यानंतर त्याबाबत आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकी मागणी काय?
शिंदे गटाचे अमरावतीमधील ज्येष्ठ नेते, मुर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी ही मागणी केली आहे. अमरावतीत सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेभनानी यांनी हे विधान केलं. त्यात स्वसंरक्षणासाठी महिलांना बंदूक दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, स्वसंरक्षणादरम्यान काही चांगली माणसं मारली गेली, तरी हरकत नाही, असं विधान त्यांनी केल्यामुळे त्यावरून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले नानकराम नेभनानी?
नानकराम नेभनानी यांनी मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात हे विधान केलं. “बांगलादेशात हिंदू धर्मीयांवर अत्याचार होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच त्यावर कठोर कृती करतील. राज्यात महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर लक्ष ठेवून आहेत. ते अशी पावलं उचलत आहेत की यानंतर कुणीही मुलींकडे वाईट नजरेनं पाहणार नाहीत. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती केली आहे की महिलांना रिवॉल्व्हर बाळगण्याची परवानगी दिली जावी. अमरावतीमध्ये जर त्यांनी तशी परवानगी दिली, तर मी सर्व भगिनींना माझ्याकडून बंदूक घेऊन देईन”, असं नानकराम नेभनानी म्हणाले.
महिलांना सुरक्षेसाठी परवाने द्या, मी रिव्हॉल्व्हर देतो, ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
“महिलांनी स्वसंरक्षणासाठी रिवॉल्व्हर बाळगावी. त्यात दोन-चार चांगली माणसं जरी मारली गेली तरी चालेल, पण कोणताही वाईट माणूस वाचता कामा नये. मी त्यांचं समर्थन करेन, न्यायालयीन लढा द्यावा लागला तर त्याचा खर्चही मी करेन. त्यांच्या कुटुंबावर कोणतंही संकट आलं तर सगळ्यात आधी तो हल्ला मी झेलेन. इथले पोलीस अधिकारी चांगल्या पद्धतीने अमरावतीत काम करत आहेत”, असं विधान नेभनानी यांनी केलं.
अमृता फडणवीसांचा विरोध
दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी नेभनानी यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. “मला वाटतं स्वसंरक्षण आवश्यक आहे. पण मी शस्त्र वापराच्या विरोधात आहे. मला वाटत नाही तो यावरचा दीर्घकालीन उपाय ठरू शकेल. आपण तात्कालिक उपायाकडे न पाहाता दीर्घकालीन उपायाकडे पाहिलं, तर आपल्याला समाज म्हणून अशा दानवी लोकांचा बहिष्कार करायला हवा. पोलिसांनी तातडीने कारवाई करायला हवी. सरकारनं तातडीनं कारवाई करावी. आपल्या महिलांचा आदर करायला शिकवणं जास्त गरजेचं आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
© IE Online Media Services (P) Ltd