फेमिनाच्या मुखपृष्ठावर झळकल्या अमृता फडणवीस

त्या काळ्या रंगाच्या मॉडर्न अशा गाऊनमधील दिसत आहेत. केस मोकळे सोडल्याने त्या एखाद्या मॉडेलप्रमाणेच दिसत आहेत.

फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर फोटो छापून येणे ही अभिनेत्रींसाठी अतिशय मानाची बाब असते. सुंदर दिसणाऱ्या अनेक अभिनेत्रींचा फोटो या मासिकाच्या कव्हर पेजसाठी वापरला जातो. याआधीही ऐश्वर्या रायसारख्या नामांकित अभिनेत्रींचे फोटो या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून आले आहेत. यावेळी या फोटसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची वर्णी लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मासिकावर त्यांचा फोटो छापून आला आहे. यामध्ये त्या काळ्या रंगाच्या मॉडर्न अशा गाऊनमधील दिसत आहेत. केस मोकळे सोडल्याने त्या एखाद्या मॉडेलप्रमाणेच दिसत आहेत. गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमृता आपल्याला काही अल्बममध्ये किंवा कार्यक्रमात गाताना दिसतात. आता फेमिनाच्या कव्हर पेजवर असलेल्या फोटोमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

आपल्या या फोटोबाबत स्वत: अमृता यांनीही ट्विट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, आपल्यातील सगळेच जण भारी काही करतील असे नाही, पण आपण लहान गोष्टीही भरपूर प्रेमाने करु शकतो. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही २०१६ मध्ये सॅव्ही मासिकाच्या कव्हर पेजवर अमृता यांचा फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची पत्नी मॉडेलिंगच्या क्षेत्रातही पदार्पण करणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याने त्या बऱ्याच चर्चेत असतात. तसेच त्यांच्या मॉडर्न राहण्यामुळेही त्यांच्याबाबत चर्चा होताना दिसते. रिव्हर अँथममध्ये मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी केलेला अभिनयही विशेष गाजला होता. या गाण्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजपा सरकारवर टीकाही झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta fadnavis photo on femina magazine