Amruta Fadnavis Pune Nasrapur Case News Update: Strict punishment demanded for child abuse offenders : पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी एका चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले, त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. १ मे रोजी घडलेल्या या भीषण प्रकारानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर नरसापूरचे ग्रामस्थ आणि पीडितेचं कुटुंब प्रचंड संतप्त झाल्याचं पाहण्यास मिळाले होते. याबरोबरच राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत अशून अरोपीला फाशीची शिक्षी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. गंभीर बाब म्हणजे, नसरापूरचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील पर्वती, थेऊर परिसरातही अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अशा अत्याचारांच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “आरोपी हा माणसाच्या रुपातील राक्षस आहे. अशा गुन्ह्यांसाठी माफी दिली जाऊ शकत नाही. अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पण आपण एक समाज म्हणून आणि एक कुटुंब म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे कारण बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडित व्यक्तीच्या ओळखीचे असतात, अनेकदा आपण त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास टाकतो, अशाच व्यक्ती अशी कृत्य करतात. याबरोबरच, शाळांनी गुड टच आणि बॅड टचबाबत अधिक जनजागृती कार्यक्रम राबवले पाहिजेत…”
“माझा सरकारला असा सल्ला असेल की असे गुन्हे करणारे लोकांना सहजासहजी बाहेर येऊ दिले जाऊ नये. त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर तुम्ही मला माझे वैयक्तिक मत विचाराल तर लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर सार्वजनिकरीत्या शिक्षा दिली पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपण कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाहीत. मात्र सराकार, पोलीस आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांना सोडू नये आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा शिक्षा मिळेल याची खात्री करावी, असे अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या.
नसरापूर प्रकरणात नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. इतकेच नाही तर, आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. अत्याचार आणि हत्या करणाऱ्या या ६५ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये नागरिकांमध्ये असलेला संताप आणि सुरक्षेची परिस्थिती पाहता, आरोपीला बुधवारी प्रत्यक्षात न्यायालयात न आणता गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
ही संतापजनक घटना १ मे दुपारी तीन ते रात्री आठच्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग), १३७ (२), १४० (१), १४० (३) (अपहरण) आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
