मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या पोस्टमुळे, ट्विट्स आणि व्हिडीओजमुळे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमृता फडणवीस खूपच सक्रिय आहेत. सध्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद देत कमी अंतर कापून जाण्यासाठी सायकल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांचा मुंबईतला सायकल चालवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या सायकलवारीची चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतल्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसल्या. त्यांनी केवळ सायकल चालवली नाही, तर या माध्यमातून त्यांनी नागरिकांना एक मोठा संदेशही दिला आहे. अमृता फडणवीस यांनी आता एक महत्त्वाचा संकल्प केला आहे. त्या आता ५ ते ७ किलोमीटरच्या परिघातील सर्व कामे कारऐवजी सायकलनेच पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले आहे. अमृता फडणवीस यांनी स्वतः या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली आहे. पेट्रोलची बचत करण्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. सायकल चालवल्याने केवळ इंधनाचीच बचत होत नाही, तर आरोग्यही उत्तम राहते, असं ही त्या म्हणाल्या. त्यातून व्यायामही होतो असं त्यांनी सांगितलं. सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. देशातही तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले आहेत. यानंतर अमृता फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अमृता फडणवीस यांची पोस्ट काय?
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर मी आता सायकल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या घरापासून ५ ते ७ किमी अंतरावरच्या परिघात मी सायकल प्रवासच करणार आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत. त्यांची बचत व्हावी यादृष्टीने हा थोडासा प्रयत्न आहे. तसंच सायकल चालवल्याने आरोग्यही चांगलं राहतं. मी हा छोटासा बदल करु शकले याचं मला समाधान आहे. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवी यांनी कान्सला जाणंही टाळलं होतं
अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. पीएम मोदींनी परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते, तेव्हा अमृता फडणवीस यांनी आपला आखाती देशांचा दौरा त्वरित रद्द केला होता. देशहितापेक्षा मोठे काहीही नाही, अशी भावना त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती. आता इंधन बचतीच्या मोहिमेतही त्या आघाडीवर दिसत आहेत. महागाईच्या या काळात त्यांच्या या साधेपणाची आणि सायकलवारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही इंधन बचतीसाठी वर्षा बंगला ते मंत्रालय बाईकने प्रवास केला होता. शिवाय महाराष्ट्रातील दौरे ही ते ट्रेनने करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीस ही सायकल चालवताना दिसल्या आहेत. शिवाय त्यांनी पाच ते सात किलोमिटर परिघात असलेली कामे सायकलनेच करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान अमृता फडणवीस या गंगर आयनेशन या दुकानात गेल्या होत्या यावरुन त्यांना ट्रोल करण्यात येतं आहे.
गंगर आयनेशनवरुन अमृता फडणवीस यांचं ट्रोलिंग का?
अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे त्या सायकल चालवत गंगर आयनेशन या ठिकाणी गेल्या. तिथे त्यांनी त्या दुकानात प्रवेश केला. ज्यावरुन त्यांना पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे. गंगर आयनेशनमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रांडचे गॉगल्स मिळतात. तुम्ही सायकल चालवत तिथे गेला आहात, म्हणजे तिथून आंतरराष्ट्रीय ब्रांडचे गॉगल खरेदी केले असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यातही काटकसर करा असं म्हटलं आहे असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आणखी एका युजरने म्हटलंय की आपला देश डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होतं आहे म्हणून संघर्ष करतोय. आम्हाला अपेक्षा आहे की गंगर आयनेशन या आंतरराष्ट्रीय ब्रांडच्या दुकानातून तुम्ही काही खरेदी केली नसावी. गंगर आयनेशनमध्ये प्राडा, अरमानी, पोर्श, मॉन्ट ब्लँकसारखे आंतरराष्ट्रीय ब्रांड्स मिळतात, तुम्ही ते खरेदी केले नाहीत ना? असंही एका युजरने म्हटलंय. अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर काही कौतुक करणाऱ्याही प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अमृता फडणवीस यांनी २०२५ मध्येच एका मुलाखतीत ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं होतं.
ट्रोलर्सबाबत २०२५ मध्ये काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या “असे अनेक प्रसंग घडले आहेत की सोशल मीडियावर लोक माझ्याबाबत ओव्हर रिअॅक्ट करतात. अशा गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून बाजूला होतात, फारकत घेतात. मी गणेश उत्सवानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिम राबवली. समाजातले काही घटक, एनजीओ आणि लहान मुलांची साथही आम्हाला लाभली. पर्यावरण पूरक गणपती मूर्ती घरी आणा यासाठीही आम्ही लोकांना संदेश दिला. मात्र ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवला आणि मी कसे कपडे घातले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. एक महिला जी व्यवस्थित विचार करु शकते, समस्या समजून घेऊ शकते जिच्याकडे तिचा आवाज आहे, तिचं म्हणणं आहे तिला ट्रोल करायला ट्रोलर्स सरसावणारच. हे फक्त माझ्याबाबतीत नाही प्रत्येक महिलेला लागू पडतं. आज समाजात अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे आपला आवाज आहे. जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो. मला हे ट्रोलर्स पार्श्वसंगीताप्रमाणे वाटतात. तुम्ही ते कर्कश्य आहे समजून त्रास करुन घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्यांना टाळणं हा चांगला पर्याय आहे. असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
