राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता या वादामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी उडी घेतली आहे. सोमवारी डोंबिवलीमध्ये दोन ठिकाणी नवरात्रोत्सवाला हजेरी लावलेल्या अमृता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. यशोमती ठाकूर यांनी शिंदेंना मिळालेल्या धमकीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता अमृता यांनी खराब डोक्याच्या लोकांची अवस्था या टीकेतून दिसून येते असा टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमक्या येत असल्यावरुनच देशाची, राज्याची अवस्था बिघडलेली असल्याचं वाटतं, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केले होते. या टीकेचा संदर्भ देत अमृता यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अमृता यांनी, “धमक्या येणं देशाची अवस्था नाही सांगत. वेगळ्या दिमाख्यात असणाऱ्या लोकांची विचारसरणी यामधून दिसून येते. मला वाटतं त्यांच्यातलेच हे लोक असू शकतात, आपल्याला काय माहित?” असं म्हटलं.

“मला वाटतं यातून देशाची काहीही व्यवस्था दिसत नाही. खराब लोकांच्या दिमाखाची (मेंदूची) व्यवस्था दिसून येते,” असा टोलाही अमृता यांनी लगावला. तसेच अमृता यांनी यापुढील प्रत्येक निवडणूक ही विकासाची असेल याच हेतूने भाजपा निवडणूक लढेल असा विश्वासही मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केला.