Amruta Fadnavis Statement on Devendra Fadnavis Delhi Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत हे उघडपणे याबाबत बोलत आहेत. तसेच भाजपाने नुकतेच त्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीत संघटनात्मक बदल केले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा पार पडला. यावरून ते दिल्लीत राजकीय कारकिर्द सुरू करतील, अशी चर्चा होऊ लागली. या सर्व घडामोडींवर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना इथे सेवा करू द्या. त्यांना का पाठवत आहात, त्यांना इथेच सेवा करू द्या”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. महाराष्ट्राची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र हे देशातील मोठे राज्य आहे. या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, याचा मला आनंद वाटतो, त्यामुळे ते इथे राहायला हवेत, अशी भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
अमृता फडणवीस ‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच या कार्यक्रमात हॅकेथॉन, आयडीथॉन हे प्रदर्शन पाहून थक्क व्हायला झाले, असेही त्या म्हणाल्या. लोकोपयोगी प्रकल्पही या विद्यार्थ्यांनी पुढे आणले आहेत. ते अमलात आणल्यास त्याचा संपूर्ण समाजाला फायदा होऊ शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
‘काँग्रेसला स्वतःचे संविधान निर्माण करायचे आहे’
काँग्रेसकडून वंदे मातरमचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत राष्ट्रगणबरोबर गायले जावे, असा निर्णय संसदेने घेतला आहे. संसदेत कायदा झाल्यानंतर जे लोक त्याचा आदर करत नसतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. काँग्रेसने आपल्या कार्यक्रमात पूर्वीचेच वंदे मातरम वाजविण्याचा निर्णय घेतला आहे, असा प्रश्नही त्यांना विचारला गेला. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, काँग्रेसला आपले स्वतःचे संविधान निर्माण करायचे आहे.

केरळमध्ये काँग्रेस नेते, गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी तिरंग्याच्या आकाराचा केक कापला, त्यावर आपल्याला काय वाटते? असाही प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, तिरंग्याच्या वापराबाबतची कायदेशीर तरतूद आपल्याला माहीत नाही. ही तरतूद पाहूनच यावर भाष्य करायला हवे.
‘जंतर-मंतरवरील आंदोलन भरकटले’
जंतर-मंतरवर आंदोलनाला सुरुवात झाली ती नीट पेपरफुटीच्या प्रश्नावर. ही सुरुवात चांगली होती. पण त्यात नंतर समाजविरोधी आणि नको असलेले घटक सामील झाले आणि त्यांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आंदोलन काहीसे भरकटले. हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरतेच मर्यादीत राहिले असते, तर चांगले झाले असते. नीटच्या बाबतीत सरकारने पावले उचलली आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे.
महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडेच – देवेंद्र फडणवीस
‘मला दिल्लीत पाठवावे, असे अनेकांना वाटते. मात्र त्या सगळ्यांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे’, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रात येण्याची शक्यता पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे.
‘मी महाराष्ट्रात आहे. जनतेने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे,’ असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. ‘मी दिल्लीत असलो तरी चर्चा होते आणि मुंबईत असलो तरी चर्चा होते. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
