“मी गाण्यामधून समाजसेवा करु शकते”; अमृता फडणवीस यांचा फ्युचर प्लॅन

“मी जे करत आहे त्यातच मला सर्वात जास्त आनंद”

अमृता फडणवीस

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी खासगी वृत्त वाहिन्यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणे आपली मते व्यक्त केली. राजकारण, सोशल मिडिया, पगार, दिल्ली बलात्कार प्रकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. यावेळी त्यांनी गाण्याबद्दलही मत व्यक्त केलं. भविष्यात राजकारणात येणार का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, गाण्यांच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना भावी वाटचालीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही गायिका आहात, गृहिणी आहात, विरोधी पक्ष नेत्याची पत्नी आहात तसेच एका मोठ्या बँकेत व्हाइस प्रेसिडंट आहात. भविष्यात राजकारणात यायला, निवडणूक लढवायला आणि राज्याच्या पहिला मुख्यमंत्री बनायला तुम्हाला आवडेल का?,” असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला.

भविष्यातील वाटचालीबद्दल अमृता म्हणतात…

या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी राजकारणात रस नसल्याचे सांगताना सोशल मिडियावर आपल्याला जे वाटते तेच बोलते असं त्यांनी स्पष्ट केलं. “मी खरचं सांगते मला राजकारणात मुळीच रस नाहीय. माझ्या मनात जे येतं ते मी लगेच बोलते. मग काय होतं तुम्ही पाहताच. सोशल मिडियावर तर मला झाशीची राणी असल्यासारखं वाटतं. सगळे लोकं इकडून तिकडून वार करता आणि मी तशीच उभी राहते. मग परत तसचं काहीतरी करते. त्यामुळे मी एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती आहे असं मला वाटतं,” असं अमृता यांनी सांगितलं. “मला समाजसेवा करायला आवडते. समाजसेवेतून मला आनंद मिळतो,” असंही पुढे बोलताना अमृता यांनी स्पष्ट केलं. एवढ्यावरच न थांबता सध्या मी वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करत असून मला समाजसेवा करायला आवडते असंही अमृता यांनी स्पष्ट केलं. “मला समाजसेवा करायला आवडते. पण मी ती समाजसेवा पडद्यामागे राहून, राजकारणात न येता दुसऱ्या क्षेत्रात कोणत्याही माध्यमातून करु शकते. मग ते क्षेत्र गाणं असेल किंवा इतर माध्यम असेल. चांगली सामाजिक संदेश देणारी गाणी आणून मी समाजसेवा करु शकते किंवा इतर काही प्रकल्प हाती घेऊ शकते. या सर्व माध्यमांमधून मी समाजसेवा करु शकते. सध्या मी जे करत आहे त्यातच मला सर्वात जास्त आनंद आहे,” असं अमृता यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

“देवेंद्रजींचे ते वक्तव्य खरंच”

एका खासगी बँकेमध्ये व्हाइस प्रेसिडंट म्हणून कार्यरत असणाऱ्या अमृता यांच्या पगाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एक भाष्य केलं होतं. “माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो,” असं फडणवीस म्हणाले. यासंदर्भात बोलताना अमृता यांनी “देवेंद्रजींनी जे वक्तव्य केलं आहे ते खरं आहे. देवेंद्रजी नेहमी खरं बोलतात. हो माझी आता तरी त्यांच्यापेक्षा टेकहोम सॅलरी जास्त आहे. माझा पगार जास्त असल्याचा त्यांना अभिमान वाटतो याचा मला गर्व आहे. पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचं त्यांना वाईट वाटतं नाही. पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाहीय याचा मला आनंद आहे,” असं सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta fadnavis talks about her future plan and singing scsg

ताज्या बातम्या