अलिबाग : मराठी माणसावर अन्याय करण्याची काही जणांची भूमिका आहे. ‘एनडी’ स्टुडिओ बळकावण्याचा प्रयत्न आहे. कर्जावर अवास्तव व्याज आकारून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. तो सहन करण्यापलीकडे आहे, अशी व्यथा ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ध्वनिमुद्रित संदेशाद्वारे व्यक्त केल्याचे उघडकीस आले आहे.
मराठी माणसाने शून्यातून निर्माण केलेला ‘एनडी’ स्टुडिओ अन्य कोणाकडे जाऊ देऊ नका. तो राज्य सरकारने जागेसह ताब्यात घ्यावा. तेथे मोठे स्मारक उभारावे, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. देसाई यांनी बुधवारी रात्री कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी एका ‘व्हॉइस रेकॉर्डर’मध्ये मनोगत ध्वनिमुद्रित केले होते. त्याच्या १० ते ११ मुद्रिका आहेत. हा ‘व्हॉइस रेकॉर्डर’ संबधितांना देण्याची सूचना देसाई यांनी एका सहकाऱ्याला केली होती. हा व्हॉइस रेकॉर्डर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यातील आवाजाचे आणि मजकुराचे पृथक्करण करण्यासाठी न्यायवैद्यक विभागाकडे पाठवला आहे.
पोलिसांनी या रेकॉर्डमधील मजकूर जाहीर केला नसला, तरी कर्जबाजारीपणाला कंटाळून देसाई यांनी आत्महत्या केल्याचे संदेशावरून दिसते. कर्ज देऊन आपली फसवणूक करण्यात आली असून, अवास्तव व्याज आकारणीद्वारे एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले आहे. मराठी माणसाने उभारलेला हा स्टुडिओ इतर कोणाच्या ताब्यात जाऊ देऊ नये तो राज्य सरकारने ताब्यात घ्यावा आणि तेथे स्मारक उभारावे अशी देसाई यांची अपेक्षा होती, असे सांगितले जाते.