सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसाचा जोर कायम आहे. जवळपास सर्व तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात एका शेतातील जनावरांचा गोठा अंगावर कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
सोलापूर शहरात शनिवारी दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. गेल्या २४ तासांत शहर व परिसरात २०.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा आदी तालुक्यांत पाऊस सलगपणे पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले आहे. मात्र दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात सायंकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू झाला असता शेतात जनावरांच्या गोठ्यात बसलेल्या तानुबाई मारूती गायकवाड (वय ८०) या वृद्ध महिलेच्या अंगावर अचानकपणे गोठा कोसळला. यात त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यावेळी गोठ्यात जनावरे नव्हती.
या दुर्घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांसह पोलिसांनी गायकवाड यांच्या शेतातील वस्तीकडे धाव घेतली. मृत तानुबाईंचा पुतण्या दिग्विजय लिंबाजी ताकमोगे यांनी कळविलेल्या माहितीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.