“ या १२ डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का?” ; पंकजा मुंडेंचं भाविनक पत्र!

जाणून घ्या समर्थकांना उद्देशून लिहिलेल्या या भाविनक पत्रात नेमकं काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे

भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आपल्या समर्थकांना उद्देशून एक भाविनक पत्र लिहिलं आहे. १२ डिसेंबर रोजी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते, या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हे भावनिक पत्र लिहल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या दिवशी त्या संकल्प करणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिवाय, आपल्या समर्थकांना देखील त्या हा संकल्प कराल का? असं त्या विचारत आहेत.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “१२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही.

“प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.”

“कोणत्याही नात्याविना इतकं प्रेक कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे, गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं!”

तर, या पत्राच्या शेवटी पंकजा मुंडे, “या १२ डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य? ” असं म्हणाल्या आहेत.

आता पंकजा मुंडे नेमका काय संकल्प करणार, त्यांनी कोणता संकल्प करण्यास समर्थकांना आवाहन केलं आहे, हे अद्याप तरी अस्पष्टच आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. येणाऱ्या १२ डिसेंबर रोजीच हे स्पष्ट होईल असं दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An emotional letter from pankaja munde to his supporters msr

ताज्या बातम्या