१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली स्फोटके भारतात आणण्यासाठी वापर करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी दुपारी एक हेलिकॉप्टर संशयास्पदरित्या उतरवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. तपासाअंती हे हेलिकॉप्टर पुण्यातील एका बांधकाम कंपनीचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचेही उघड झाल्याने या कंपनीवर तसेच हेलिकॉप्टरच्या वैमानिकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
श्रीवर्धनमधील शेखाडी येथील समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक हेलिकॉप्टर उतरल्याचे येथील संतोष चौकर या ग्रामस्थाने पाहिले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांनी तपासास सुरुवात केली. हे हेलिकॉप्टर पुण्यातील श्रद्धा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर रवाना झाले होते.
यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाची परवानगी नव्हती, असे उघड झाले. हेलिकॉप्टर उतरवण्यापूर्वी कंपनीने पोलिसांकडे ना हरकत दाखला मागितला होता. मात्र, जागेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांची परवानगी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही हेलिकॉप्टरला परवानगी दिली नाही. मात्र, तरीही या कंपनीने हेलिकॉप्टर उतरवले. त्यामुळे वैमानिक व हेलिकॉप्टरची मालकी असलेल्या श्रद्धा कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची सूचना रायगड पोलिसांनी हवाई वाहतूक विभागाला केली आहे. याशिवाय पोलीसही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

* ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले, त्याच भागात एका बडय़ा राजकीय पुढाऱ्याचा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर उतरवल्यानंतर काही वेळानंतर शिर्के कन्स्ट्रक्शनचे आणखिन एक हेलिकॉप्टर उतरवण्यात येणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.  यासाठी मुंबईतील जुहू येथील हवाई वाहतुक कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आल्याचे पत्र सादर करण्यात आले.
* या पाश्र्वभूमीवर या गृहनिर्माण प्रकल्पामुळेच या परिसरात हेलिकॉप्टरची वर्दळ वाढल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, पोलिसांची परवानगी नसतानाही हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेतील मर्यादाही उघड झाल्या आहेत.