कर्जत : ’कलम का बादशाह’ हा मराठी व हिंदी भाषेतील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सामाजिक वास्तव मांडणारी त्याची कथा आहे. बी. आर. फिल्म निर्मित या चित्रपटाच्या निर्मात्या वंदना मधुकर भैलुमे असून, दिग्दर्शनाची धुरा आनंद कुमार सरोदे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातून गायक आनंद शिंदे प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
आनंद शिंदे यांनी या चित्रपटामध्ये मंत्र्याची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आपल्या गायनामधून आनंद शिंदे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, चित्रपटामध्ये ते अभिनय प्रथमच करत आहेत. हे कथानक त्यांच्या पात्राभोवतीच फिरते. शिंदे यांनी पदार्पणातच प्रभावी कामगिरी केली आहे, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्या वंदना मधुकर भैलुमे यांनी दिली.
अभिनेत्री मोनालिसा बागल ही प्रमुख नायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत असून, दीक्षा असे तिच्या पात्राचे नाव आहे. या भूमिकेत तिने अतिशय कसदार अभिनय केला आहे. “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय…” हे लोकप्रिय गाणे तिच्यावर यापूर्वी चित्रित करण्यात आले होते. आजही ते तरुणांच्या हृदयाची धडधड वाढवते. या चित्रपटाकडून मोनालिसा बागल या अभिनेत्रीला खूप मोठ्या आशा आहेत. यश डिबाळे हा अभिनेतादेखील या चित्रपटामध्ये आहे.
चित्रपटाची कथा एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अधिकारी कसा संघर्ष करतो, शोषित समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा खरा चेहरा तो कसा उघड करतो आणि व्यवस्थेतील अडथळ्यांवर मात करत बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत कसे पोहोचवतो, हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. ग्रामीण मातीतील रांगडा पोलीस अधिकारी म्हणून जय मौर्य हा नवा चेहरा आकर्षण ठरणार आहे.
या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कर्जत (अहिल्यानगर) परिसरात करण्यात आले. ग्रामीण समाजरचना आणि वास्तववादी मांडणी यामुळे चित्रपटाला वेगळा आयाम मिळाला आहे. यापूर्वी कर्जतमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले; त्याच परंपरेत ‘कलम का बादशाह’देखील मोठी छाप पाडेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामीण पार्श्वभूमी असलेली कथा आणि ‘बिग बजेट’ निर्मितीमुळे ‘कलम का बादशाह’ हा चित्रपट सामाजिक जाणीव जागवणारा आणि मनोरंजनासोबत विचार करायला लावणारा ठरेल.
