रायगड लोकसभा मतदारसंघासाठी झालेली निवडणूक ही माझ्या आजवरच्या राजकीय जिवनातील संस्मरणीय निवडणूक ठरली आहे आणि हा तर दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तींचा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनंत गीते यांनी दिली आहे.
  ते लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांशी बोलत होते.  ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होती, कारण एकाच वेळी तीन वेगळ्या फ्रन्टवर मला लढायचे होते. पक्षाबाहेरील शत्रूंबरोबर पक्षातील शत्रूंचा मला सामना करावा लागला. मात्र रायगडकरांनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि रायगडातील दुष्ट प्रवृत्तींचा नाश केला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.
  संपूर्ण निवडणुकीत शेकापबद्दल उघडपणे न बोलणाऱ्या गीते यांनी निवडणुकीनंतर मात्र तोफ डागली आहे. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांना रायगडकरांनी नाकारले आहे. सेनेशी युती तोडून शेकापने तर स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला, आगामी काळात विधानसभा लढवण्याची ताकदही शेकापत राहिली नाही. आणि आगामी काळात शेकापसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून या निवडणुकीतही आम्हाला सहाही मतदारसंघांत यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
   दापोली गुहागरमध्ये शिवसेनेचे मताधिक्य घटल्याचे त्यांनी मान्य केले. पक्षामधील हितशत्रूंमुळे हा परिणाम असल्याचे रामदास कदम यांचे नाव न घेता ते म्हणाले. मात्र पक्षस्तरावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले, मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
  कोकणाचा भौतिक विकास झालेला नाही. त्यामुळे यापुढील काळात कोकणाच्या भौतिक विकासाला चालना देणार असल्याचे ते म्हणाले, कोकणात सागर संपत्ती विपुल प्रमाणात आहे.
या सागर संपत्तीला धनसंपत्तीत कसे बदलता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गीते यांनी सांगीतले. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आले आहे. त्यामुळे चांगले दिवस येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

गीतेंचा गनिमी कावा निर्णायक
राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार मंत्री सुनील तटकरे यांच्याशी दोन हात करताना महायुतीचे खासदार अनंत गीते यांनी अवलंबलेला गनिमी कावा निर्णायक ठरला. गीते यांच्यापुढे तटकरेंच्या रूपाने काँग्रेस आघाडीने तगडे आव्हान उभे केले होते. त्यातच गेल्या निवडणुकीत सेनेला पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाने तटकरे यांचे एके काळचे समर्थक रमेश कदम यांना उभे करून गीतेंची आघाडी तोडण्यासाठी कंबर कसली. कदम यांना सुमारे १ लाख मते मिळाली. उत्तम संघटनकौशल्य आणि आर्थिक ताकदीची जोड असलेल्या तटकरेंनी प्रचार यंत्रणेत कोणतीच कसूर ठेवली नव्हती. पण त्यांनी जाहीर सभांवर जास्त भर दिला, तर गीतेंनी गावोगाव प्रचाराचा गनिमी कावा अवलंबला. सुनील तटकरे याच नावाच्या अपक्ष उमेदवाराने या निवडणुकीत ९ हजार मते खाल्ली, तर मुझफ्फर जैनुद्दीन चौधरी या आणखी एका अपक्ष उमेदवारानेही ९ हजार मते घेतली. राज्यातील आघाडी सरकारच्या सर्वाधिक भ्रष्ट मंत्र्यांपैकी एक, अशी असलेली तटकरेंची प्रतिमाही या निर्णायक क्षणी त्यांना अडचणीची ठरली.