परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू

श्रीमती गोयल यांनी दिलेल्या सूचनेवरून स्वागतास कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येणे टाळले.

परभणी : पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर पुनरस्थापना झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच त्या परभणी येथे रुजू झाल्या. कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता पार पाडण्याऐवजी गोयल यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. आज  गुरुवारी (दि. ५) सकाळी साडे सात वाजता देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून त्या येथे पोहोचल्या. मंडळ अधिकारी व तलाठी या दोघांनी शिष्टाचाराप्रमाणे रेल्वेस्थानकावर त्यांचे स्वागत केले.

श्रीमती गोयल यांनी दिलेल्या सूचनेवरून स्वागतास कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येणे टाळले. दरम्यान, श्रीमती गोयल यांनी कृषी विद्यापीठात भेट देऊन राज्यपाल यांच्या दौऱ्यासाठी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली.  राज्यपाल येथे थांबणार असलेल्या विश्रामगृहाची पाहणी केली. राज्यपालांना देण्यात येणाऱ्या मानवंदना, कृषी महाविद्यालयातील सभागृह, नाहेप प्रकल्प, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. या वेळी पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कुलगुरू डॉ.अशोक ढवण,  अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, प्राचार्य डी. एन.गोखले आदी उपस्थित होते. आज  जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती  गोयल यांचे दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.  या वेळी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रे स्वीकारल्यावर माध्यमांशी जिल्हाधिकारी गोयल यांनी संवाद साधला.जिल्ह्यातील सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सकारात्मक काम करण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोयल यांची प्रशासकीय कारकीर्द

श्रीमती आंचल गोयल यांनी चंदीगड येथे बीई इलेक्टॉनिक्स पदवी सन २०१२ मध्ये मिळविली आहे. सन २०१३ मध्ये आयकर विभागात त्यांची निवड झाली होती. पती निमित गोयल २०१४ च्या तुकडीचे ‘आयपीएस’ अधिकारी आहेत.२०१४ साली ‘आयएएस’ झाल्यानंतर श्रीमती गोयल यांना महाराष्ट्र कॅडेर मिळाले. अकोला जिल्हयात २०१५-१६ यावर्षी त्यांनी आपला परीविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. केंद्र शासनाच्या पेट्रोलियम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य केले.

श्रीमती गोयल यांची पहिली नियुक्ती नोव्हेंबर २०१६ पासून पालघर जिल्हयात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून झाली होती. मे २०१८ पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anchal goyal take charge of district collector of parbhani zws