सावंतवाडी: कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसूरे-आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी (९ फेब्रुवारी) आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.

​उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

​प्रशासनाची चिंता आणि नियोजन

​९ फेब्रुवारी रोजीच आंगणेवाडी जत्रा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. एकाच वेळी मतमोजणीची प्रक्रिया आणि जत्रेचा जनसागर यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.​ मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त आणि जत्रोत्सवासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था.भाविकांच्या गाड्या आणि निवडणूक ड्युटीवरील वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष ‘ट्रॅफिक प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे.

​नागरिकांना आवाहन: विनाकारण गर्दी टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

​”लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी येत आहेत. अशा वेळी नागरिकांनी संयम आणि शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून दोन्ही प्रक्रिया शांततेत पार पडतील.” असे प्रशासनाने आवाहन केले आहे.