मुंबई: अंगणवाडी केंद्रांमार्फत बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये. आहाराचा दर्जा, योग्य स्थिती आणि लाभार्थ्यांना तो स्वीकारार्ह आहे की नाही, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोषण आहाराचा थेट संबंध बालकांच्या आरोग्याशी असल्याने त्याच्या गुणवत्तेत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. विशेषतः सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना हा आहार दिला जात असल्याने भारतीय खाद्य निगम (एफसीआय) प्रशासनाशी समन्वय साधून अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांना दिल्या.

अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार केंद्रात स्वीकारताना त्याचा दर्जा तपासूनच स्वीकारावा. ‘टीएचआर’ अर्थात टेक-होम रेशन प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने लाभार्थ्यांना वितरण करावे. लाभार्थी अनुपस्थित असल्याने आहार शिल्लक राहिल्यास तो कालबाह्य होण्यापूर्वी वितरित करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.

पोषण आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अंगणवाडी सेविकेने मुख्यसेविकेच्या माध्यमातून प्रकल्प अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. त्यानंतर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तक्रारीची शहानिशा करावी, असे निर्देश देण्यात आले.

पोषण आहार पुरवठादारांनाही निर्धारित वेळेत पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरवठ्यापूर्वी आहाराची तपासणी, स्वच्छता आणि योग्य वजनाची खात्री करावी. एफसीआयकडून प्राप्त धान्य स्वच्छ करून पॅक करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.

पुरवठा केलेल्या आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास दोन दिवसांच्या आत संबंधित आहार बदलून देणे बंधनकारक राहणार आहे. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पुरवठादाराने आपला प्रतिनिधी संबंधित अंगणवाडी केंद्रात पाठवावा आणि त्याची माहिती आयुक्त कार्यालयाला द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याची किमान ८० टक्के कालमर्यादा शिल्लक असणे आवश्यक आहे. तसेच टीएचआरचा पुरवठा करताना त्यातील प्रथिने आणि कॅलरीचे प्रमाण निर्धारित निकषांनुसार असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बालकांचे उत्तम पोषण आणि आरोग्य हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने संपूर्ण यंत्रणेने याबाबत अधिक दक्ष राहावे, असे तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.