मुंबई: अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅच्युएटी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच त्यांना महिन्याला मिळणारे मानधनही मिळणे कठीण झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून त्यांच्या मानधनाच्या वाट्यातील केंद्र सरकारचा हिस्साच न मिळाल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीसांची आर्थिक कोंडी झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेत जयंत पाटील यांनी केला.
अंगणवाडी सेविकांना १३,००० रुपये आणि मदतनीसांना ७,५०० रुपये मानधन मिळते. त्यातील केंद्राचा वाटा अनुक्रमे ४,५०० व ३,५०० रुपये आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून हा केंद्राचा हिस्सा मिळालाच नाही. परिणामी, राज्यातील सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कामाचा डोंगर वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढत आहेत, पण मानधन मात्र थांबले आहे. हे अन्यायकारक असल्याचे जयंत पाटील म्हणाले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आपल्या समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत.
बालकांचे संगोपन, महिलांचे आरोग्य, कुपोषणाविरोधातील लढा ही सर्व जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे, त्यांनाच मानधनासाठी संघर्ष करावा लागत असून त्यांना मानधन मिळवून देण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. या डबल इंजिन सरकारचे केंद्रातील मेन इंजिनच निकामी झाले आहे. राज्यातील बालसंगोपन, महिला आरोग्य, कुपोषण रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच मानधन मिळत नाही हा हे सरकारचे मुख्य इंजिन निकामी झाल्याचा आणखी एक सबळ पुरावा आहे.
जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासारख्या अनेक केंद्र शासन पुरस्कृत योजनांचे पैसे केंद्राकडून राज्य शासनाला मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्याचप्रमाणे केंद्राकडून पैसे न मिळाल्याने दिवस-रात्र सेवा देणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अन्याय घडत आहे. हे कोणत्याही सरकारसाठी भूषणावह नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.
