परभणी :‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द ’अशी घोषणा करत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पडत्या पावसात आज, मंगळवारी आंदोलन केले. जिल्ह्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. तर दोन ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी रोखली. मोजणी बंद पाडल्याने आलेले अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
कानेगाव (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शवला. आपण कोणत्याही परिस्थितीत ही मोजणी करू नये. या मोजणीला आमचा विरोध आहे, अशी भूमिका यावेळी रामचंद्र पंडितराव मोकाशे, धनंजय चंद्रकांत मोकाशे, हेमंत चंद्रकांत मोकाशे, शंकर राठोड, महादेव डुकरे, किसनराव इखे यांनी घेतली.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या भागातील शेतकऱ्यांचे सर्व भवितव्य हे शेत जमिनीवर अवलंबून आहे आणि ही जमीन जर अधिग्रहित झाली तर आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. आमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य अंध:कारमय असून, त्यामुळे आम्ही शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवत आहोत. जर सरकारने जबरदस्तीने पाऊल पुढे टाकले तर कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. अशा स्थितीत शासनाने भूसंपादन प्रक्रिया थांबवून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी ओंकार पवार, दत्तराव कोरडे, डिगंबर मोकाशे, दत्तराव मोकाशे, श्रीकांत इखे, रावसाहेब मोकाशे आदी उपस्थित होते.
पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथेही शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली. संयुक्त मोजणी करण्याकरिता भूमी अभिलेखचे अधिकारी आले यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस अधिकारी होते. सुरवाडी, नावकी, पिंपळगाव, आहेरवाडी येथील बाधित शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध दर्शवला. यावेळी नावकी येथील सरपंच हनुमान तुकाराम भुसारे, माधवराव पडोळे, आहेरवाडी येथील लिंबाजी खंदारे, गोपाळराव मोरे, गोविंद घाटोळ, महेशकुमार घाटोळ, अनंता घाटोळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पोखर्णी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात ॲड. माधुरी क्षीरसागर, शिवाजी कदम, प्रसाद गोरे, ओंकार पवार, गणेश पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.