अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांची ईडीच्या कोठडीत रवानगी

वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हकालपट्टी केल्यानंतर देशमुखांवर केले होते आरोप… आरोपांची सीबीआयसह ईडीकडून सुरू आहे चौकशी… देशमुखांनाही समन्स

anil deshmukh news, personal secretary, Enforcement Directorate,
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता.(संग्रहीत छायाचित्र)

वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने काल (२५ जून) दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. दरम्यान, ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरू असून, ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी काल (२५ जून) सकाळपासून पाच ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश होता. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारतीत छापा टाकला होता. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवानांचं एक पथकही घटनास्थळी होतं.

हेही वाचा- “अनिल देशमुख ईडीच्या चौकशीसाठी आज हजर राहणार नाहीत”, वकिलांनी दिली माहिती

या छापेमारीनंतर ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली. पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. त्यानंतर दोघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!; पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदी असताना १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली होती. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil deshmukh news anil deshmukh pa news personal secretary enforcement directorate ed arrest bmh

ताज्या बातम्या