Sharad Pawar NCP Split: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटीच्या दृष्टीने वेगाने घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा दावा केला आहे. तुतारीचे (शरद पवार गटाचे) पाच खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात, असा दावा आत्राम यांनी केला आहे. यावर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आत्राम तुम्ही स्वत:ची मुलगी सांभाळू शकले नाही”, असे टोला अनिल देशमुखांनी लगावला. तसेच, खासदार फुटणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.
अनिल देशमुखांची आत्राम यांच्यावर टीका
“बाबा तुम्ही स्वत:ची मुलगी सांभाळू शकले नाही, तुमची मुलगी तुतारीच्या चिन्हावर, तुमच्या (बापाच्या) विरोधात लढली. तुम्हाला मुलगी सांभाळता आली नाही. त्यामुळे काहीतरी तारतम्य ठेवा. अनेक वर्षे तुम्ही राजकारणात आहात, अनेकदा आमदार झाले, मंत्री झाले, त्यामुळे बोलताना थोडं तारतम्य ठेवावं”, असे अनिल देशमुख म्हणाले. पक्षातील सर्व खासदार शरद पवार यांच्याबरोबर असल्याचेही देशमुख म्हणाले. यासाठी काही अतिरिक्त खबरदारी घेण्याची गरजही नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीवर भाष्य
सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीवर भाष्य करताना, सुनेत्रा पवारांनी राजकीय कामासाठी अमित शाहांची भेट घेतली असेल, असे सांगत खासदार कुठेही जाणार नाहीत, असे देशमुखांनी स्पष्ट केले. मध्यंतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार अशा वावड्या उठवल्या होत्या त्यात देखील काही तथ्य नव्हते असेही देशमुखांनी पुढे सांगितले. वर्धापन दिनाला सर्व खासदार, आमदार उपस्थित होते, तिथेही शरद पावरांशी त्यांची भेट झाली, अशा चर्चा तेव्हाही झाल्या नाहीत, असे देशमुखांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे – देशमुख
अनिल देशमुख यांनी त्यापूर्वी एक्सवर एक पोस्ट करुन देखील भूमिका मांडली होती. “पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट एनसीपीचे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे वक्तव्य पूर्णतः निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. आत्राम यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार खासदार फोडण्याच्या वार्ता कराव्या”, असे देशमुखांनी पोस्टमध्ये लिहले होते.
आत्राम काय म्हणाले होते?
“जर पुन्हा निवडून यायचं असेल तर सर्वांनाच मतदारसंघात विकासकामे करण्याची आणि विकासाबरोबर राहण्याची गरज आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आता लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. पक्ष देखील आणखी मजबूत होत आहे. काही माजी खासदार देखील आता आमच्या पक्षात येणार आहेत, काही विद्यमान खासदार देखील आमच्या पक्षात येऊ शकतात, त्यामध्ये काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण विकासाचा मुद्दा आहे, लोकांना विकासकामे हवी आहेत”, असंही धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. आत्राम यांनी खासदार कधीपर्यंत येऊ शकतात? यावर बोलताना १२ डिसेंबर ही तारीख देखील दिली आहे.
