राष्ट्रवादीशी युतीचा इशारा देत स्वपक्षीयांना इशारा

डिसेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार असली तरी राजकीय पटलावर दिवाळीच्या आधीच फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य आणि केंद्रात सत्तास्थानी असणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. या निवडणुकीची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविल्याने आणि त्यांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची साथ लाभल्याने अस्वस्थ असणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षात विरोधी गट स्थापन करून उभयतांना आव्हान दिले. तरीही भाजप नेतृत्व दखल घेत नसल्याने आता गोटे यांनी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी युती करण्याचे संकेत देत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी गोटे यांच्याशी युतीसाठी तयार होईल की नाही, हे सांगता येणे अवघड असले तरी या इशाऱ्याने गोटेंचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे. भाजपवरील दबाव वाढविण्याबरोबर स्थानिक राजकारणात महाजन, भामरे यांना न जुमानता आपले वर्चस्व राखण्याची त्यांची धडपड आहे.

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने त्यासाठी नाशिक, जळगाव महापालिकांसह नगरपालिका निवडणुकींचा अनुभव असणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपविली. पक्षाची ताकद वाढल्याने शिवसेनेला भाजप  विचारातही घेत नाही. विरोधी पक्षातील मातब्बरांना आपल्याकडे खेचून रिंगणात उतरण्याचा मार्ग भाजपने शोधलेला आहे. यामुळे सर्वत्र स्वबळावर सहजपणे निवडणुका लढविल्या जातात. तोच प्रयोग धुळे महापालिकेत होणार असला तरी त्यात भाजपचे स्थानिक आमदार गोटे हे मुख्य अडसर ठरल्याचे चित्र आहे.

जामनेर, जळगावच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाजन यांची जादू शेजारील धुळ्यातही चालेल, असे पक्षाला वाटते. महाजन यांनी जामनेर, जळगावमध्ये सत्ता मिळवून दिल्याची पुनरावृत्ती धुळ्यात होणार नाही, असा सूचक इशारा देत गोटे यांनी महिनाभरापासून शहरात भाजपची प्रचार मोहीम राबविली. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पक्षाच्या गोटात संभ्रम निर्माण केला आहे. प्रचार मोहीम राबवीत त्यांनी भाजपला आव्हान दिले. आमदार गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्यात महाजन आणि भामरे जोडगोळीने एकत्रितपणे नियोजन सुरू केल्याने गोटेंची खदखद वाढली आहे. आपण पालक आमदार असल्याने निवडणूक प्रचार आणि अन्य कार्यक्रम घेऊ शकतो, असा दावा त्यांच्यामार्फत केला जातो. या घटनाक्रमावर पक्षनेतृत्व मौन बाळगून आहे. शहरावर प्रभुत्व राखण्यासाठी महापालिका महत्त्वाची आहे. यामुळे गोटेंनी प्रसंगी स्थानिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि गोटे यांच्यातून विस्तवही जात नाही. अनेक वर्षांपासून निवडणुकांच्या माध्यमातून उभयंतांमध्ये टोकाचे वैर निर्माण झाले आहे. गोटे यांच्या संकल्पनेतून होणारी विकास कामे कदमबांडे यांच्या पचनी पडली नाही. ते कोणत्याही कारणांनी कामांना विरोध करतात, असे गोटे यांचे म्हणणे असते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि गोटे हे भाजपचे आमदार असल्याने त्यांच्या कामांना महापालिकेतून विरोध केला जातो. गोटे यांनी साकारलेली बहुचर्चित पांझरा चौपाटी बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त करण्यात आली. गोटे सातत्याने कदमबांडे अर्थात राष्ट्रवादीवर आगपाखड करतात. आजी-माजी आमदारांमधील संघर्ष कायम असताना गोटे यांनी अचानक कदमबांडे अर्थात राष्ट्रवादीशी युती करण्याचे संकेत दिले आहेत.

युती करायची की नाही, यासंबंधी निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यांनी दिलेला निर्णय अंतिम राहील, असे गोटे यांनी म्हटले आहे. युतीचे संकेत देताना गोटे यांनी सावध पवित्रा स्वीकारला. स्थानिक विरोधकांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजवर गोटे यांना भरघोस निधी देऊन राजकीय बळ दिले आहे. निवडणूक नियोजनातून पक्षाने त्यांना बाजूला सारल्याने निर्माण झालेल्या असंतोषातून गोटेंनी राष्ट्रवादीशी युतीचे संकेत दिल्याचे मानले जाते. भाजपने हे धोरण कायम ठेवल्यास गोटे ऐन वेळी पुन्हा एकदा लोकसंग्राम पक्षामार्फत िरगणात उतरू शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.

युतीचा प्रस्ताव आला तर शहर विकासासाठी तो विचारात घेतला जाईल. यासाठी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्ष, त्यांचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली जाईल. पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली युतीबाबत निर्णय घेतला जाईल.

– राजवर्धन कदमबांडे (माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)