Anil Parab at Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी कदम यांच्यावर वाळू चोरीचा आरोप केला असून त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा देखील केला आहे. यासह त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कदमांवर कारवाई कराल का असा प्रश्न विचारला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विधान परिषदेत बोलताना परब यांनी राज्याच्या महसूल राज्यमंत्र्यांवर वाळू चोरीचे आरोप केले. अनिल परब म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोलिसाला निलंबित करण्याचे अधिकार आहेत. कुठल्याही लोकसेवकाने गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई करता येते. आमदार, मंत्री लोकसेवकाच्या व्याख्येत बसतात. महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडल्याची मी पाच प्रकरणं तुम्हाला (बावनकुळे) देतो. पुढील तीन दिवसांत अशी प्रकरणं देतो आणि पुरावेही सादर करतो. त्यांच्यावर कारवाई करून हे राज्य सरकार कणखरपणा दाखवणार आहे का?
अनिल परबांचे महसील राज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
अनिल परब म्हणाले, “महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली. ती वाळू तुमच्या सरकारच्या धोरणाप्रमाणे तहसीलदाराकडे द्यायला हवी. त्यापैकी पाच ब्रास वाळू गरिबांना द्यायला पाहिजे. मात्र, इथे तसं झालं नाही. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे की जी ताकद, जी हिंमत एक कणखर महसूलमंत्री तलाठी, तहसीलदार व आरटीओ अधिकाऱ्यांच्या बाबतीत दाखवतात, ती हिंमत महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवतील का?”
“…तर आम्ही तुमच्या हिमतीची दाद देऊ”, अनिल परबांचं बावनकुळे यांना आवाहन
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार म्हणाले, “महसूल मंत्र्यांनी संबंधित ठिकाणाला भेट दिल्याचे पुरावे, तिथल्या नोंदी व अहवालांची कॉपी मी सभागृहाला देतो. त्यानंतर महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का? त्यावेळी हिंमत दाखवाल का? माझा महसूल मंत्र्यांना प्रश्न आहे की आमच्यावर कारवाई करताना जी हिंमत दाखवता ती महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवाल का? छोटी चिलटं मारू नका, मोठा गडी मारा. असं केल्यास आम्ही तुमच्या हिमतीची दाद देऊ. तुम्ही ताकदवान नेते आहात असं मानू. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.’