अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स

अनिल परब यांनी पहिल्या समन्स नंतर पूर्वनियोजित कार्यक्रमांचं कारण देत चौकशीसाठी अनुपस्थिती दर्शवली होती

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसरं समन्स बजावलं आहे. २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. “आशा आहे की आता तरी अनिल परब चौकशीला हजर राहतील”, असं खोचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी ईडीने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.

३१ ऑगस्ट रोजी परब यांना पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी ईडीकडे १४ दिवसांची मुदत मागितली होती. ती तेव्हा ईडीने मान्यही केली होती.

तर गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी ट्विट करत परबांवर खोचक टिप्पणी केली आहे. आशा आहे आता तरी अनिल परब २८ सप्टेंबरला ईडीसमोर उपस्थित होतील असं ट्विट त्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil parab ed notice second time for money laundrying case vsk

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी