Anil Parab On Ganesh Naik and Girish Mahajan : राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विषयांवर चर्चा होत आहे. आज विधानपरिषदेत बिबट्याचा आणि भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगलाच तापल्याचं पाहायला मिळालं. बिबट्याच्या मुद्द्यांवरून विधानपरिषदेत अनिल परब यांनी प्रश्न विचारत गणेश नाईक आणि गिरीश महाजनांना चिमटे काढले.
आमदार अनिल परब यांनी कुंभमेळ्याच्या संभाव्य धोक्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर…? असा सवाल करत अनिल परब यांनी गिरीश महाजनांना चिमटे काढले. परब म्हणाले की, ‘गिरीश महाजन तिथे घुसतील तिथे दुसऱ्या कोणाची काय हिंमत आहे घुसण्याची. गिरीश महाजनांनी खूप वाघ, बिबटे फाडून जेरबंद केलेत”, असं म्हणत अनिल परबांनी गिरीश महाजनांना टोला लगावला.
अनिल परब काय म्हणाले?
“माझा प्रश्न हा प्रश्नोत्तराच्या चर्चेतील नाही, पण हा प्रश्न मी क्यूरॅसिटी म्हणून विचारत आहे. भटके कुत्रे आणि बिबट्या हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. पण आपला मूळ विषय आहे की कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर?, एकदा गिरीश महाजन जिथे घुसले तिथे दुसऱ्या कोणाची घुसण्याची काय हिंमत आहे? गिरीश महाजन एवढे सक्षम आहेत, कारण त्यांनी खूप चांगले वाघ, बिबटे फाडलेले आहेत, जेरबंद केलेले आहेत.”
आता खाली त्यांनी बसून म्हटलं की डिझास्टर (Disaster) मॅनेजमेंट माझ्याकडेच आहे, तर सभागृहातील पाठिमागून कोणी तरी म्हटलं की, डिझास्टरच तिथे गेलेलं आहे, तर मग आणखी मॅनेजमेंट काय करायचं? आता हा माझा प्रश्न आहे. तसेच कुंभमेळ्यात कॅमेऱ्याचा उपयोग कशासाठी होणार? याचाही खुलासा करावा”, असं अनिल परब यांनी म्हटलं.
गणेश नाईक काय म्हणाले?
अनिल परब यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, “कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून निवड झालेली आहे. तसेच त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन पण आहे. मी त्यांना परवा बोललो की नाशिक जिल्ह्यातील बिबटे आपण जेरबंद नाही केले तर एखाद्या दिवशी त्या कुंभमेळ्यात एखादा बिबट्या घुसला तर कुंभमेळ्यावर पाणी फेरलं जाईल. मग गिरीश महाजन यांनी मला लगेच सांगितलं की मला एक पत्र द्या आणि तुमची तिकडची गरज काय सांगा, म्हणजे लगेच निधीची तरतूद करतो. बिबट्यांचे हल्ले ही राज्याची आपत्ती मानून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास आपण सूचना दिलेल्या आहेत”, असं गणेश नाईक यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.
