महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या नाट्यमय सत्तांतरणाचं स्मरण सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांनाही झालं. या दोन वर्षांत भाजपा नेते वारंवार ‘सरकार पडणारच’ अशी भविष्यवाणी करतच होते. मात्र तरीही सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. नारायण राणे यांनीही महाविकास आघाडीचं सरकार पडणार, असं विधान नुकतंच केलं होतं. त्यावरुन भाजपा नेते नारायण राणे यांना अनिल परबांनी टोला लगावला आहे.

यासंदर्भात बोलताना परब म्हणाले, नारायण राणे काय म्हणतात याच्यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि त्यामुळे हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.

एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय?

एसटी संपाबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय? याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. परब म्हणाले, “कामगार न्यायालयाने जर संप बेकायदेशीर ठरवला, तर अशी तरतूद आहे की एका दिवसाला आठ दिवसांचा पगार कापावा लागतो. कामगारांनी या सगळ्याचा विचार करावा. राज्य शासनाची अशी कोणतीच इच्छा नाही की, कामगारांचं आर्थिक नुकसान करावं. परंतु, जे संपावर आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नो वर्क नो पे हे तर करणारच, पण एक दिवसाला आठ दिवस कापणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. पण आम्हाला अशा कोणत्याही कारवाईला भाग पाडू नका, असं आवाहन मी कर्मचाऱ्यांना करत आहे. तसंच त्यांनी लवकरात लवकर कामावर यावं, असं आवाहनही मी त्यांना करतो”.