Anil Parab On Satara ZP Election Politics : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून शिंदे सेना आणि भाजपात वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वादाचे पडसाद आज थेट विधानसभा आणि विधानपरिषदेत उमटले आहेत.

या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेबाबत बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांना डिवचलं आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपावरून अनिल परबांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका केली. ‘आता तुमचे वाघ कुठे गेले? मंत्री मार खातायेत, राष्ट्रवादीनेही मार खाल्ला, या राज्यात काय चाललंय? मंत्रीच मार खातायेत’, असं म्हणत अनिल परब यांनी शिंदे सेनेला थेट सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलं.

अनिल परब काय म्हणाले?

“महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही जे घडलं नाही ते आज आम्हाला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्रीच पोलिसांचा मार खातायेत. जर मंत्रीच मार खात असेल, आम्ही या घटनेकडे मंत्री म्हणून नाही तर सरकार म्हणून पाहत आहोत. या राज्यात मंत्री मार खात असतील, सत्तेतील कार्यकर्ते मार खात असतील, तर सर्वसामान्य व्यक्तींचं काय?”, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

“काही दिवसांपूर्वी काहींनी उठाव केला. हा उठाव का केला गेला तर त्यांचा स्वाभीमान राष्ट्रवादी चिरडतेय. त्यासाठी सत्ता पालट केली, आम्ही वाघ आहोत असं सांगतात. मात्र, आज या राज्यात मंत्री मार खात आहेत. मंत्र्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की ते भारतीय जनता पक्षाचं नाव घेण्यासाठी ते घाबरतात. पोलीस तुम्हाला मारतात आणि तुम्ही गप्प बसता? मग तुमचा स्वाभीमान कुठे गेला? मला तर वाईट वाटतं की राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय, म्हणजे फक्त शिवसेनाच (शिंदे गट) नाही तर राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय. मंत्री मार खातायेत. सत्तेतील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पायऱ्यावर आंदोलन करतात. जे स्वत:ला वाघ समजत होते, ते वाघ आता कुठे गेले? हे वाघ आता शेपटी घालून बसलेले आहेत. आता यांची भाजपाच्या विरोधात बोलण्याची हिंमत होत नाही”, असं म्हणत अनिल परब यांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका केली.